सातारा प्रतिनिधी । यावर्षी 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. त्यामुळे मूर्तीकारांकडून गणेशमूर्ती बनवण्याची लगबग सुरु झाली आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव / नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रशासकीय अधिकारी व नागरिकांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. गट विकास अधिकारी तसेच मुख्याधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत, नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रात समिती स्थापन करुन केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी म्हटले आहे.
जिल्हाधिकारी डुडी यांनी म्हंटले आहे की, गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात पर्यावरणाच्या हनीच्या दृष्टीने अनेक प्रकार केले जातात. नागरिकांनीही पर्यावरणपूरक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव साजरा करावा व पर्यावरण संरक्षणामध्ये सहभाग घ्यावा. तसेच मूर्तिकारांनी प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी केंद्र सरकारच्या सूचनांचे पालन करत मातीच्या मूर्ती निर्मितीस प्राधान्य द्यावे.
केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्रालयाने 13 जून या दिवशी आदेश काढले आहेत. त्यानुसार सर्व जिल्हाधिकार्यांनी केंद्र सरकारच्या सूचनेवर कार्यवाही करायची आहे. त्याप्रमाणे आम्ही पत्र काढून संबंधित गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकारी यांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मूर्तीकारांनी मूर्ती बनवताना त्या ‘पीओपी’ऐवजी मातीच्या बनवाव्या कारण पीओपीच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे पुढील अडचणी निर्माण होतात, त्याचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.