सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यात अपघातातील बळींची संख्या वाढत असल्याने जिल्हा पोलिस प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भविष्यात होणारे अपघात रोखण्यासाठी कार चालविताना सीटबेल्ट आणि दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे हे गरजेचे आहे. याबाबत वारंवार सूचना करण्यात आल्यानंतर देखील त्या पाळल्या जाणत नसल्याचे लक्षात आल्याने जिल्ह्यात पुन्हा हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. या निर्णयाची अंलबजावणी देखील करण्यास पोलिसांकडून सुरुवात करण्यात आलेली आहे. याबाबत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.
जिल्ह्यात दररोज अपघाताच्या घटना घडतात. यामध्ये काहीजण जखमी होतात तर काहींना आपला जीव गमवावा लागतो. रस्त्यातील खड्डे, धोकादायक वळण, ब्लॅकस्पाॅट हटविण्यात आल्यानंतर देखील अपघात होण्याचे प्रमाण थांबत नाही हे लक्षात आल्यानंतर जिल्हा पोलिस दलाकडून नुकतीच एक बैठक घेत अपघाताबाबत आढावा घेण्यात आला.आढावा बैठकीवेळी कार चालविताना सीटबेल्ट आणि दुचाकी चालविताना हेल्मेट न घातल्यामुळे अनेकांचा जीव गेल्याचे कारण समोर आले.
वास्तविक, परिवहन आयुक्तांनी मार्च २०२२ मध्ये हेल्मेट सक्तीचे परिपत्रक काढले होते. हेल्मेट आणि सीटबेल्ट बंधनकारक असताना देखील अनेकजण त्याचा वापर करीत नाहीत. अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर विमा कंपनीकडून देखील अपघातावेळी दुचाकी चालकाने हेल्मेट घातले होते का? किंवा चारचाकी चालकाने सीटबेल्ट लावला होता का? याची पडताळणी केली जाते.
त्यामुळे हेल्मेट व सीटबेल्ट घातल्यास आपला जीव वाचविता येईल. तसेच विम्यासाठी क्लेम करणे देखील सोयीचे होईल, या सर्व बाबींचा विचार करून सातारा जिल्ह्यात लवकरच हेल्मेट सक्ती करण्याबाबतची चर्चा आढावा बैठकीत करण्यात आली. त्यानुसार सुरूवातीला वाहनधारकांमध्ये हेल्मेट वापरणे तसेच कार चालविताना सीटबेल्टलवण्याबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला.