कराड प्रतिनिधी । सध्या आधारकार्ड हे सर्वांत महत्त्वपूर्ण ओळखपत्र म्हणून मानले जाते. इतर कोणत्याही कागदपत्रासाठी आता आधारकार्डची गरज हमखास भासतेच. अलीकडे बाळाचेही जन्मजात आधारकार्ड काढले जाते. अनेक पालक मुलांचे आधार कार्ड काढतात. मात्र, मुलांचे आधारकार्ड पाच वर्षांनी अपडेट करायला हवे. तसेच मोठ्यांचेही आधार कार्ड दर दहा वर्षांनी अपडेट करणे गरजेचे असल्याची गोष्ट माहिती असणे आवश्यक आहे.
एक दिवसाच्या बालकांपासून ते पाच वर्षांपर्यंतच्या बालकांचे आधार कार्ड बायोमॅट्रिकद्वारा काढण्याची आवश्यकता नसते. मात्र, जेव्हा बालक पाच वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते, तेव्हा त्याचे आधार कार्ड बायोमॅट्रिक पद्धतीने काढले जाते. यासाठी शहरातील नोंदणीकृत महा ई सेवा केंद्रात जाऊन नवीन आधारकार्ड काढण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी पैसे लागतात तेवढे पैसे देऊन आधारकार्ड काढावे.
आधार हा भारतीय रहिवाशांना जारी केलेला बारा अंकी युनिक ओळख क्रमांक असतो. आधार अपडेट केल्यामुळे बनावटगिरी टाळण्यासाठी तसेच फसवणूक ओळखण्यासाठी मदत होते. त्यामुळे मोठ्या व्यक्तींना दहा वर्षांनी ते अपडेट करावे लागते.
मुलांचे आधार 5 वर्षांनंतर अपडेट करणे आवश्यक
एक दिवसाच्या बालकांपासून ते पाच वर्षाच्या बालकांचे आधार कार्ड काढले जाते. मात्र, पाच वर्षांनंतर ते अपडेट करणे आवश्यक असते. पुन्हा पंधराव्या वर्षीही त्याचे ते आधारकार्ड अपडेट करावे लागते.
मोठ्यांचे आधार 10 वर्षांनंतर करा अपडेट
मोठ्यांनी आधार काढल्यानंतर दर १० वर्षांनी ओळखीचा पुरावा आणि पत्त्याची कागदपत्रे अपडेट करणे आवश्यक आहे. शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार अपडेट करणे आवश्यक आहे.
कागदपत्रे काय?
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पत्त्याच्या पुराव्यांकरिता पासपोर्ट, रेशन कार्ड, फोटो ओळखपत्र, मतदान ओळखपत्र, मागील 3 महिन्यांचे वीज बिल, किसान पासबुक, इत्यादी कागदपत्रे ग्राह्य धरली जातात.
कोठे करणार अपडेट?
शहर व जिल्ह्यातील कुठल्याही आधार केंद्रावर किंवा महा ई सेवा केंद्रावर लहान बालकांचे व मोठ्यांचे आधार कार्ड अपडेट केले जाते. आता पोस्टानेही ही सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे पोस्टातही आधारकार्ड अपडेट करता येते.
खर्च किती?
1) बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन बदल- ण्यासाठी, नाव, जन्मतारीख किंवा पत्ता बदलण्यासाठी, प्रत्येक अपडेटसाठी ५० रुपये शुल्क आकारले जाते.
2) नवीन आधार काढण्यासाठी साधारणतः शंभर रुपये शुल्क द्यावे लागते.
3) शंभर रुपयांपेक्षा जास्त पैसे आधारकार्ड काढण्यासाठी आकारले जात नाही.
अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांसाठी आधारकार्ड आवश्यक : माधुरी कारंडे
लहान मुलांचे आधारकार्ड नवीन काढणे तसेच मुलांना पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या आधारकार्डचे अपडेट करणे आवश्यक आहे. कारण अंगणवाडीमध्ये आता शासनाकडून नवीन ॲप देण्यात आले असून त्यावर अंगणवाडीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट केले जात आहेत. ज्या पाच वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्याचे आधारकार्ड अपडेट झालेले नाहीत. त्यांचे आधारकार्ड अपडेट करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया बनवडी येथील अंगणवाडी शिक्षिका माधुरी सदाशिव कारंडे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
आधारकार्ड अपडेटींगसाठी शासनाने प्रयत्न करावेत : सरफराज मुल्ला
तहसील प्रशासनाकडून तालुक्यातील गावागावात असलेल्या अंगणवाड्यांमध्ये शिकणाऱ्या मुलांचे व शाळातील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करण्याची मोहीम हाती घ्यावी. हि मोहीम हाती घेतल्यास वियार्थ्यांना शाळा प्रवेशसह इतर दाखल्यासाठी झटपट आधारकार्ड अपडेट करून मिळतील, अशी प्रतिक्रिया कराड येथील गुडलक महा ई-सेवाकेंद्राचे चालक सरफराज मुल्ला यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
प्रशासनाने आधारकार्ड अपडेटसाठी कॅम्प घेणे आवश्यक
पूर्वी लहान मुलांचे तसेच मोठ्या व्यक्तींचे आधारकार्ड, रेशनकार्डसोबत विविध दाखले काढण्यासाठी शासनाकडून कॅम्प आयोजित केले जात असत. मात्र, अशा प्रकारचे कॅम्प आता घेतले जात नाही. त्यामुळे अनेकांना आधारकार्ड अपडेट करण्यासाठी महा ई सेवा केंद्रात जावे लागते. जर शासनाने स्थानिक पातळीवर अंगणवाड्या, शाळा या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या मुलांचे आधारकार्ड अपडेट करण्याची मोहीम, कॅम्प राबविल्यास ते पालकांसाठी व मुलांच्या दृष्टीने हिताचे होईल.