कराडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत महत्वाची माहिती; ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । विद्यार्थ्यांना जर अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे असेल तर त्यांच्यासाठी कराडचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय उत्तम आहे. शैक्षणिक वर्ष 2023-24 चे इयत्ता 12 वी व सीईटीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून. सध्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. महाविद्यालयात ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब कुटूंबातील विद्यार्थ्यासही प्रवेश घेता येणार आहे. शिवाय यावर्षी कोणत्याही स्वरूपाची फी वाढ केली जाणार नाही. तसेच महाविद्यालयाचे आजी-माजी तज्ञ विद्यार्थी विविध स्थानिक कंपन्यांना सहकार्य करून त्यांच्या तांत्रिक स्वरूपाच्या अडचणी सोडवणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे चेअरमन, नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. मोरेश्वर भालसिंग यांनी दिली.

कराड येथील शासकीय महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेला नुकतीच सुरुवात झाली आहे. याबाबत महाविद्यालयात आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जे. वाघ, प्रवेश समितीचे अध्यक्ष डॉ. के. एन. आळसुंदकर, सहा. प्राध्या. प्रा. यु . एस. पाटील, सहा. प्राध्या. विद्युत अभि. डॉ. एस के पाटील, डॉ. एल. एल. कुमारवाड, टी पी ओ सहाय्यक प्रा. पौर्णिमा कावलकर, प्रा. उमा पाटील यांची उपस्थिती होती.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाघ म्हणाले की, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने राबवली जाते व त्यासाठी विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रातील महाविद्यालयासाठी एकत्र अर्ज दाखल करू शकतात. सदर अर्ज राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्या cet.cell.mahacet.org/CAP-landing-page-2023 या संकेतस्थळावरून भरला जाऊ शकतो.

सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथे ARC केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. शा. अ. म. कराड ही संस्था १९६० मध्ये स्थापन झालेली असून संस्थेस AICTE तसेच DTE मान्यता प्राप्त आहे. संस्थेला सन २०१५ पासून विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) द्वारा शैक्षणिक स्वायतता प्रदान करण्यात आलेली आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थी अंतिम वर्षात विविध कॅम्पस इंटरव्ह्यु मध्ये भाग घेत असतात. त्याद्वारे त्यांची अनेक नामवंत कंपन्यांमध्ये निवड होत असते. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये महाविद्यालयातील अंतिम वर्षातील ३०० हून अधिक विद्यार्थ्याना ४५० हून अधिक ऑफर्स मिळाल्या असून कमाल पॅकेज १८ लाख व किमान पॅकेज ३ लाख इतके होते. सरासरी पॅकेज ५ लाख इतके होते. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत एमपीएससी परीक्षेत राज्यात अव्वल क्रमांक पटकावले आहेत.

खासगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये प्लेसमेंटसाठी सहकार्य

1960 साली कराड मध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात आले. महाविद्यालयात दरवर्षी नामांकित कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्हूद्वारे प्लेसमेंट होत असून यासाठी आता विद्यार्थ्यांना त्या कंपन्यांची माहिती आधी देणार आहोत. त्यामुळे कोणत्या कंपनीत काय आहे याची माहिती आधीच विद्यार्थ्यांना कळणार आहे. तसेच केवळ शासकीय अभियांत्रिकीच नव्हे तर कराडमधील खासगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही यामध्ये सहभागी करून घेवून त्यांनाही नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटसाठी सहकार्य करणार असल्याचे डॉ. भालसिंग यांनी सांगितले.