कराड प्रतिनिधी । संपूर्ण देशभर हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात येत आहे. उद्या गुरुवारी 78 व्या स्वातंत्र्य दिन उत्साहात सर्वत्र साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवयार सातारा जिल्ह्यासह कराड येथेही राष्ट्रध्वज विक्रीचे स्टॉल ठिकठिकाणी बाजारपेठेत उभारण्यात आले आहेत. कराड शर्यत देखील शुक्रवारी कॉलेज, महाविद्यालय परिसरात तसेच बाजारपेठेत ध्वज विक्रीसाठी असल्याने त्याची खरेदी करण्यात आली आहे. मात्र, तिरंगा घेतल्यानंतर प्रत्येक नागरिकाला ध्वजसंहिता माहिती असणे आवश्यक आहे.
उद्या गुरुवारी दि. १५ रोजी भारताचा ७८वा स्वातंत्र्यदिन आपण साजरा करीत आहोत. या राष्ट्रीय सणाची तयारी सर्वत्र सुरू असून सर्व शाळा, महाविद्यालये शासकीय इमारती, ग्रामपंचायती यांसह विविध संस्थांमध्ये तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. मात्र, ध्वजारोहण करताना, त्यानंतर ध्वजाबाबत काही नियम पाळणे आवश्यक आहेत. कारण राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहिता 2002 व राष्ट्रीय अवमान कायदा 1971 मध्ये तरतूद केलेली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे महत्वाचे आवाहन
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी देखील महत्वाचे आवाहन केले आहे. राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून सर्व राष्ट्रीय कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या दिवशी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यास बंदी आहे. 15 ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्य दिनी प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये याची दक्षता घ्यावी. तसेच कार्यक्रम झाल्यानंतर मैदानात, रस्त्यावर व इतर ठिकाणी इतस्ततः पडलेले खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तहसील वा जिल्हास्तरीय समित्यांकडे सुपूर्द करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
ध्वजाच्या लांबी-रुंदीचे प्रमाण किती?
ध्वजाचा आकार आयताकृती असावा. त्याच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर ३:२ असे असावे. ध्वज कितीही छोटा किंवा मोठा असला, तरी त्याचे लांबी रुंदीचे गुणोत्तर पाळायला हवे. ध्वजावरील अशोक चक्रामध्ये २४ आरे असणे आवश्यक आहे.
अशी आहे ध्वजसंहिता
1) तिरंगा ध्वज सूर्यास्तापूर्वी उतरवायला हवा.
2) तिरंगा फाटलेला किंवा मळका असू नये.
3) अन्य कोणताही ध्वज शेजारी असेल, तर तो तिरंगा ध्वजापेक्षा कमी उंचीवर फडकवावा.
4) तिरंगा ध्वज फाटला असेल किंवा मळला असेल, तर तो नष्ट करण्याचे विशिष्ट नियम आहेत, त्यांचे पालन व्हावे.
5) ध्वजारोहणावेळी वक्त्याने समोर पाहावे आणि ध्वज त्याच्या उजव्या बाजुला असावा.
6) ध्वजाचा जमिनीला स्पर्श होता कामा नये.
7) ध्वज फडकाविण्याची जागा स्वच्छ असावी.
8) ध्वज सर्वांना दिसेल असा लावण्यात यावा.
9) कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी ध्वजाचा वापर करू नये.
10) ध्वज फडकावताना नारिंगी रंग वर राहील याची दक्षता घ्यावी.
11) ध्वजाचा वापर रुमाल, सोफ्याचे कव्हर, नॅपकिन, अंतरवस्त्रं यासाठी कापड म्हणून करू नये.