कराड प्रतिनिधी । मनोज जरांगे-पाटील यांच्या आदेशानुसार कराड उत्तर व दक्षिण विभागातील मराठा समाजाची विधानसभा निवडणुकीबाबतची भूमिका राहील. जरांगे-पाटील जो आदेश देतील तो अंतिम मानत त्यानुसार वाटचाल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी कराडच्या कृष्णा कॅनॉल येथील हॉलमध्ये बैठकीत मराठा समाज बांधवांच्या वतीने घेण्यात आला. दरम्यान, उद्या दि. २४ ऑक्टोबरला सातारा जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघातील मराठा बांधवांशी मनोज जरांगे-पाटील हे संवाद साधणार आहेत.
कराड उत्तर व दक्षिणमधील मराठा समाज बांधवांची कृष्णा कॅनॉल येथील हॉलमध्ये मंगळवारी बैठक पार पडली. सुमारे दोन तास झालेल्या या बैठकीत कराड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघातील सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली. मनोज जरांगे-पाटील यांच्याशी यापूर्वी झालेल्या चर्चेची माहिती काही मराठा बांधवांनी या बैठकीत उपस्थितांना दिली. त्यानंतर उपस्थित मराठा बांधवांनी आपापली मते व्यक्त करत सत्ताधारी महायुती तसेच विरोधी महाविकास आघाडीच्या बोटचेप्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला.
उद्या जरांगे पाटील यांच्यासोबत होणाऱ्या महत्वाच्या बैठकीत कराड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघातून मराठा समाज बांधवांनी स्वतंत्ररीत्या निवडणूक लढवावी अथवा नाही? यासह या दोन्ही विधानसभा निवडणुकीत कोणाला पाडायचे? याचा निर्णय होणार आहे. त्यामुळे दक्षिण व उत्तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुती विरोधात मराठा बांधव रिंगणात उतरणार की नाहीत? याचा अंतिम निर्णय गुरुवारी होणार आहे. जरांगे- पाटील जो निर्णय घेतील, तो अंतिम असणार आहे.