सातारच्या पर्यटन वाढीसह विकासकामांंबाबत मंत्री गिरीश महाजन-खा. उदयनराजेंची चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | भाजपा नेते गिरीश महाजन यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसह जिल्ह्यातील प्रस्तावित विकासकामांवर चर्चा केली.

सातारा जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या दृष्टीने राज्य शासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, मागील वर्षभरात तब्बल ६०० हून अधिक कोटींचा निधी राज्य सरकारने दिला आहे. या निधीतून जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासह किल्ल्यांचा विकास व जतन केले जाणार आहे.

पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचे पर्यटन धोरण तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांचा समावेश आहे. यामध्ये पुढील १० वर्षात ही पर्यटनस्थळे तसेच पायाभूत सुविधा विकसित करुन पर्यटकांचा ओघ दुप्पट करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.

ग्रामीण व शहरी भागात पर्यटनाद्वारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. सातारा जिल्ह्यात उच्चतम दर्जाचे शाश्वत व जबाबदार पर्यटन विकसित करुन ग्रामीण भागातील पर्यटन व कृषी पर्यटनास वाव देण्याच्या दृष्टीने विविध पुरस्कारही देण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन घटकांना व्याज परतावा, एसजीएसटी परतावा, विद्युत शुल्कासह विविध करांमध्ये सवलतींचा धोरणात समावेश आहे.

ग्रामीण भागातील पर्यटन उद्योगांसाठी होम स्टे, ॲग्रो टुरिझम या स्पर्धा विभागनिहाय राबविण्यात येणार आहेत. या धोरणामुळे राज्याचा देशातील राज्यांमध्ये अग्रेसर राज्य श्रेणीत समावेश होणार आहे. देशातील व राज्यातील पर्यटकांना आकर्षित करणे, पर्यायाने व्यापार- उत्पन्न आणि उद्योजकता यांना चालना देणे, पर्यटन क्षेत्रामध्ये ग्रामीण व शहरी भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे, पर्यटन क्षेत्रात नवीन गुंतवणूक आणणे, राज्याच्या महसुलात वाढ करणे अशा अनेक गोष्टींवर या धोरणात भर देण्यात येणार आहे.