कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील मराठा समाज बांधवांची गुरूवारी सायंकाळी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मराठा बांधवांच्या वतीने महत्वाचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सगेसोयर्यांबाबत अध्यादेश काढण्याचे आश्वासन देऊन शासनाने मराठा समाजाची फसवणूकच केली असल्याची संतप्त भावना कराडमधील मराठा समाज बांधवांनी व्यक्त केली आहे. सत्ताधार्यांसह विरोधकांना धडा शिकवण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातून एक ते दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्धार मराठा समाज बांधवांनी केला आहे.
यावेळी बैठकीत मराठा बांधव म्हणाले की, मनोज जरांगे-पाटील यांना बदनाम करण्यासाठी खोटेनाटे आरोप केले जात आहेत. राजकीय षडयंत्राद्वारे मनोज जरांगे-पाटील यांच्याबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असून राज्य शासनाने एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय शासनाने त्वरित मागे घेतला पाहिजे.
कुणबी – मराठा व मराठा – कुणबी हे एकच असल्याचे ऐतिहासिक काळापासून पुरावे आहेत. त्यानंतरही ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही. दोनदा रद्द होऊनही पुन्हा एकदा स्वतंत्रपणे आरक्षण देत मराठा समाजाची दिशाभूल करण्यात आली आहे, अशा प्रकारे संतप्त भावना मराठा समाज बांधवांनी या बैठकीत व्यक्त केल्या.