सातारा प्रतिनिधी | माण तालुक्यातील पांढरवाडी येथील खरात वस्तीवर सतत खंडित वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ चांगलेच हैराण झाले असून, वीजपुरवठा नियमित करावा, अशा मागणीचे निवेदन महिला अधिकार परिषदेच्या वतीने दहिवडीच्या वीज वितरणच्या कार्यालयातील शाखा अभियंता कदम यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे, खरात वस्ती येथे २० ते २५ कुटुंब असून, सगळ्यांनी घरामध्ये वीज कनेक्शन घेतले आहे व नियमित वीज बिल भरत आहेत, असे असताना वस्तीवरील वीज पुरवठा सतत खंडित होत आहे. कधी कधी तर दोन दोन दिवस वीज जाते. विजेवर चालणारी घरगुती उपकरणे महिला वर्गांना चालवता येत नाहीत.
अंधारामुळे अनेकवेळा विंचू, साप चावण्याचे प्रकार घडले आहेत. परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नाही, पण पुढे होणार नाही, याची हमी देता येत नाही. त्यामुळे वीजपुरवठा नियमित करावा, सिंगल फेजचे कनेक्शन तात्काळ द्यावे व अंधारामुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर महिला अधिकार परिषदेच्या अध्यक्षा भारती पवार, कल्पना खरात, पुष्पा भुजबळ, राणी अवघडे, वंदना कुंभार, वैशाली चव्हाण, सारिका गायकवाड, छाया पांढरे, मनीषा जाधव, सुषमा खरात, मालन खरात, नंदा खरात कलावती खरात आदी महिलांच्या सह्या आहेत.