सातारा प्रतिनिधी । संपूर्ण जिल्ह्यात दि. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाणार आहे. यानिमित्त सातारा शहरात भव्य अशी मीरबानूक काढण्यात येणार आहे. तर जिल्ह्यात देखील जयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्त मिरवणुक मार्गासह सर्व जिल्ह्यात सर्व देशी दारु किरकोळ विक्री (सीएल-३) बिअर विक्री परवाने (एफएल/बीआर-२) विदेशी मद्यविक्री पूर्णपणे बंद ठेवण्याची मागणी राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार-स्वयंरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, दि. १९ फेब्रुवारी रोजी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे. त्या दिवशी सर्व जाती धर्मातील लोक गुण्या गोविंदाने आपल्या राजांची मिरवणूक काढत असतात. ही जयंती सर्वत्र साजरी होत असल्याकारणाने या दिवशी मद्यपान बंदी दिवस (ड्राय डे) म्हणून शासनाने घोषीत करावा.
जेणेकरून दि. १९ फेब्रुवारी रोजी सर्व जाती धर्मातील नागरिक शांततेने एकोपा जपत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतील. सर्व जाती धर्मातील लोक एकत्रीत आल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्व जाती धर्मातील लोकांना समजेल तसेच त्यांचे आचार विचार युवा पिढीसह आबाल वृध्द आचारणात आणतील व गुण्या गोविंदाने सामाजिक सलोखा जपत जयंती उत्साहात साजरी करतील. त्यामुळे १९ फेब्रुवारी रोजी प्रशासन-शासन यांनी मद्यपान बंदी दिवस म्हणून घोषीत करावा व छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहाने साजरी होईल याची दक्षता घ्यावी, अशी मागणी मुल्ला यांनी केली आहे.