सातारा प्रतिनिधी | आगामी विधासभेसाठी वाईसह जिल्ह्यात चार मतदारसंघ मागणार असल्याचे काॅंग्रेसचे जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण पाटील यांनी आढावा बैठकीत जाहीर केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली येथे संघटनेच्या कामासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस जयदीप शिंदे यांनी बैठकीचे नियोजन केले होते.
श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले, कराड दक्षिण पाठोपाठ वाई तालुक्यात काँग्रेसचे संघटन बांधण्यात तालुकाध्यक्ष यशस्वी झाले आहेत .त्यामुळेच जिल्ह्यात विधानसभेसाठी प्राधान्य क्रमाने वाई मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आग्रही मागणी करणार आहे, असे सांगितले.
यावेळी तालुकाध्यक्ष विलास पिसाळ यांनी वाईमध्ये संघटनेची बांधणी, बूथ कमिट्या,ग्राम कमिट्या कशा तयार केल्या याचा आढावा घेतला.
जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी वाईमध्ये कोणत्याही मोठ्या नेत्याशिवाय अशी मजबूत संघटना बांधणे केवळ अशक्य असतानाही ते तुम्ही शक्य करून दाखवले, असे सांगत त्यांनी वाईतील काँग्रेस समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी जयदीप शिंदे यांची उमेदवारी काँग्रेसच्या सभासदांनी एकमताने मागितली आहे. तरीही महाविकास आघाडी ज्या उमेदवाराला उमेदवारी देईल त्याचे काम करण्याची ग्वाही जयदीप शिंदे यांनी यावेळी दिली.