जिल्ह्यातील ‘या’ शिलेदारांनी ठोकलाय लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही शड्डू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा हा राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. त्यामुळे अनेकजण निवडणुकांना सामोरे विविध जाऊन राजकारणात आपले नशीब आजमावत असतात. यात काहींची अपेक्षापूर्ती होते, तर काहींचा अपेक्षाभंग. जिल्ह्यातील काही मातब्बरांनी लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही निवडणुका लढल्या. यात काही शिलेदारांनी विजयाचा गुलालही उडविला.

यंदाच्या विधानसभेला देखील अशीच परिस्थिती असून, लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या काही उमेदवारांनी विधानसभेच्या मैदानात शड्डू ठोकला आहे. हे मैदान कोण गाजवणार अन् कोण कोणाला चितपट करणार? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. यशवंतराव चव्हाण हे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिले होते.

सातारा लोकसभा मतदारसंघात सातारा-जावळी, वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण व पाटण या सहा मतदारसंघांचा समावेश होतो. 1951 ते 1998 पर्यंत 1996 चा अपवाद वगळता या मतदारसंघावर काँग्रेसची मक्तेदारी होती. या कालखंडात यशवंतराव चव्हाण, किसन वीर, प्रतापराव भोसले, अभयसिंहराजे भोसले हे दिग्गज नेते या मतदारसंघातून खासदार झाले. 1996 मध्ये शिवसेनेचे हिंदूराव नाईक-निंबाळकर खासदार झाले होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर 1999 पासून आतापर्यंत या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे.

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर 2004 पर्यंत दिवंगत लक्ष्मणराव पाटील साताराचे खासदार राहिले. त्यानंतर शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीत घेऊन खासदार केले. 2009 ते 2019 पर्यंत उदयनराजे भोसले यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. 2019 च्या लोकसभेचा निकाल लागल्यानंतर त्यांनी दोनच महिन्यांत खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला.

१) प्रतापराव भोसले यांनी १९६२ ते ८० या कालावधीत वाई विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९८४ ते ९६ या कालावधीत सलग तीन वेळा ते सातारा लोकसभा मतदासंघातून खासदार झाले.

२) शालिनीताई पाटील १९९५ साली विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्या. यानंतर १९९९ व २००४ साली सलग दोन वेळा त्यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९८० मध्ये त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विरुद्ध खासदारकीची निवडणूक लढविली होती.

३) अभयसिंहराजे भोसले यांनी १९७८ ते ९५ या कालावधीत सातारा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९९८ मध्ये ते सातारा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले.

४) उदयनराजे भोसले यांनी १९९८च्या पोटनिवडणुकीत सातारा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर आमदारकीची निवडणूक लढली व ते विजयी झाले. २००९ ते २०१९ सलग तीन वेळा साताऱ्याचे खासदार होते. २०१९च्या पोटनिवडणुकीत पराभूत झाल्यानंतर २०२४च्या लोकसभेत पुन्हा ते विजयी झाले.

५) चिमणराव कदम फलटण विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार होते. २००४ मध्ये त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविली होती.

६) रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी फलटणमधून विधानसभा निवडणूक 2004 मध्ये लढवली होती; पण त्यांना यश मिळाला नाही. २०१९ मध्ये ते माढामधून खासदार झाले. २०२४च्या निवडणुकीत ते पराभूत झाले.

कोरेगावात शशिकांत शिंदेंनी विधानसभेसाठी थोपटलेत दंड

मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांना कडवी झुंज दिली. मात्र, या निवडणुकीत ते पराभूत झाले. आता शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत.

पुरुषोत्तम जाधव वाईतून अपक्ष म्हणून रिंगणात

शिंदेसेनेचे माजी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी वाई विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढविली. पुढे २००९मध्ये शिवसेना, तर २०१४ ला अपक्ष म्हणून सातारा लोकसभेची निवडणूक लढविली. आता पुन्हा एकदा त्यांनी वाई मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.

पाटणला सत्यजित पाटणकर रिंगणात

पाटण विधानसभा मतदार संघाचा विचार केल्यास या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित पाटणकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. पाटणमध्ये 2019 मध्ये शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजितसिंह पाटणकर अशी लढत झाली होती. त्यावेळी शंभूराज देसाई यांना 1 लाख 6 हजार 266 मतं मिळाली होती तर सत्यजीतसिंह पाटणकर यांना 92 हजार 91 मतं मिळाली होती. यावेळेस देखील सत्यजित पाटणकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरून निवडणूक लढवीत आहेत.

उत्तरेत मनोज घोरपडे पुन्हा रिंगणात

कराड उत्तर विधानसभा मतदार संघात राष्ट्र्रवादी शरदचंद्र शरद पवार गटाकडून बाळासाहेब पाटील विरुद्ध भाजपचे मनोज घोरपडे असा सामना पाहायला मिळत आहे. यशवंत विचाराचा मतदारसंघ असलेल्या कराड उत्तर मतदार संघात संस्थात्मक राजकारण आणि शरद पवारांची साथ यामुळे बाळासाहेब पाटील आत्तापर्यंत ५ वेळा कराड उत्तरचे आमदार राहिलेत. मात्र, त्यांच्या विरोधात भाजपकडून मनोज घोरपडे हे रिंगणात उतरले आहेत.

कराड दक्षिणेत अतुल भोसले रिंगणात

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात भाजपकडून अतुल भोसले पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. डॉ. अतुल भोसले यांनी विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उमेदवार म्हणून शड्डू ठोकला आहे. यंदाही व बाबांमध्ये कराड दक्षिणेत काटे कि लढाई होईल हे नक्की.