जिल्ह्यातील गणेश उत्सव मंडळांसाठी महत्वाची बातमी; सहायक धर्मादाय आयुक्तांनी केले महत्वाचे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । यंदाच्या वर्षी गणेशोत्सव हा शनिवारी दि. ७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मात्र, गणेशोत्सव साजरा करण्यासाठी खास करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडून महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सर्व गणेश उत्सव मंडळाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी देणगी, वर्गणी स्वीकारण्यापूर्वी परवाना दाखविणेची व देणगी/वर्गणी मिळालीबाबतची आवश्यक ती पावती देण्याची खबरदारी घ्यावी, असे देखील सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे.

सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी केलेल्या आवाहनात असे म्हटले आहे की, सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ४१(क) नुसार धार्मिक व सार्वजनिक स्वरुपाच्या कार्यक्रमासाठी वर्गणी, देणगी जमा करावयाची असल्यास सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. संस्था नोंदणी अधिनियम, १८६० व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० अन्वये नोंद असलेल्या व ज्यांच्या उद्देशामध्ये गणेश उत्सव साजरा करणे असा उल्लेख असणा-या संस्थाना अशी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.

गणेश उत्सव परवानगीचे आवश्यक अर्ज या कार्यालयामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सन 2024 सालातील तात्पुरत्या स्वरुपातील परवानगी देण्याचे काम 5 ऑगस्ट पासून कार्यालयात सुरु करणेत येणार आहे. तसेच नवीन परवानगीसाठी अर्ज करतेवेळी त्या त्या क्षेत्रातील नगरसेवक/ ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांचेकडील उक्त ठिकाणी गणेश उत्सव साजरा करणेस अनुमती असल्याचे संमती पत्रक सादर करणे आवश्यक आहे. सन 2024 मध्ये गणेश उत्सव साजरा केलेल्या मंडळाने नवीन परवाना अर्ज सादर करतेवेळी गेल्या वर्षीचा परवाना क्रमांक व हिशोब दाखल करावेत.

सन 2024 मधील सार्वजनिक गणेशोत्सवासाठी निधी गोळा करण्यासाठी परवानगी देण्याचे काम 5 ते 6 सप्टेंबर अखेर चालू राहणार त्यानंतर परवानगी दिली जाणार नाही याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी. संबंधीत लोकांनी सहायक धर्मादाय आयुक्त, सातारा राजधानी टॉवर्स तिसरा मजला यादोगोपाळ पेठ, सातारा येथील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच गणेशोस्तव परवानगीसाठी मंडळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज सदर करू शकतात.

देणगीदारांनी देणगी देण्यापूर्वी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडील परवानगी प्रत पाहून खात्री करून देणगी, वर्गणी बाबत निर्णय घ्यावा. तसेच सर्व गणेश उत्सव मंडळाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी देणगी, वर्गणी स्वीकारण्यापूर्वी परवाना दाखविणेची व देणगी/वर्गणी मिळालेबाबतची आवश्यक ती पावती देण्याची खबरदारी घ्यावी, असे सहाय्यक धर्मादाय आयुक्त सातारा विभाग सातारा यांनी कळविले आहे.