सातारा प्रतिनिधी । वातावरण बदल, पावसाचे पाणी व पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण न केल्यामुळे घटसर्प, फऱ्या, पीपीआर व आदी रोगांची जनावरांना लागण होते. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्यामुळे माशा, डासांची उत्पत्ती वाढलेली आहे. मात्र, जनावरांना आजाराची लागण झाल्याचे लक्षात येताच त्यांचे लसीकरण व उपचार करून घेणे आवश्यक आहे. घटसर्प, फऱ्या या आजारांची लागण होऊ नये म्हणून जिल्ह्यात पशु संवर्धन विभागाकडून पावसाळापूर्वीच लसीकरण मोहीम राबवून जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ३२ हजार पशुधनाला लस देण्यात आली आहे.
ज्या काही शेतकऱ्यांनी पावसाळ्यापूर्वीचे लसीकरण करून घेतलेले नसलयामुळे जनावरांना आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, जनावरांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. पावसाळ्यात वयस्कर जनावरांना तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस ताप, नाका-तोंडातून घरघर आवाज येऊ लागल्यास ताबडतोब उपचार करावेत. अन्यथा, घटसर्प आजाराची लागण होऊन पाच दिवसांच्या कालावधीत जनावर मृत होऊ शकते. दरम्यान, गावात संक्रमित जनावरे आढळल्यास पशुसंवर्धन विभागाला कळवून लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.
1) घटसर्प : या आजारामध्ये जनावरांना ताप येतो, श्वास घेण्यास त्रास होतो. घशाभोवती सूज येऊन जनावरे मृत्युमुखी पडतात. जनावरांच्या शरीरामध्ये घटसर्पाचे जंतू असतात. वातावरणात झालेला बदल व उन्हाळ्यात पौष्टिक चारा न मिळाल्यामुळे शरीरावर ताण येऊन त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते.
2) फऱ्या : या आजारामध्ये जनावरांना ताप येतो व पायांना सूज येऊन जनावरांना चालण्यास त्रास होतो. कमी वयाची जनावरे या रोगास जास्त बळी पडतात. त्यामुळे जनावरांचे वेळीच लसीकरण करणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वी ब्लॉक क्चार्टर (बीक्यू) ही लस घ्यावी.
3) मलाल खूर : या आजारामुळे जनावरांना धाप लागणे, श्वास घेताना अडचण येणे, तोंडात फोड येतात व कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
4) आंत्रविषार : शेळी, मेंढी या वर्गातील जनावरांना या आजारांची मोठ्या प्रमाणात लागण होते. जास्त कोवळे गवत खाल्ल्यास अपचन होते. यावेळी शेळ्या आजारी पडून चालताना हळूवारपणा येतो. याकडे पशुपालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
5) जंत प्रादुर्भाव : पावसाळ्यात जंत पाण्यात मिसळल्याने पाणी दूषित होते. दूषित पाणी पिल्यामुळे शरीरातील जंतू वाढून प्राणी दगावतात.
जिल्ह्यात ‘इतकी’ आहे गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या आणि डुक्करांची संख्या
सातारा जिल्ह्यात सध्या पशु संवर्धन विभागाकडून जनावरांची लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली असून जिल्ह्यात लाखांच्या संख्येने जनावराची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, डुक्कर आढळतात. पशु संवर्धन विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार यामध्ये गायीची संख्या ३ लाख ५२ हजार ४३६, म्हैशी ३ लाख २६ हजार ८९६, शेळ्या ३ लाख ६४ हजार ३४८, मेंढ्या १ लाख ८५ हजार ९०५ तसेच डूक्कर ३१३ इतकी संख्या आहे.
काय काळजी घ्याल ?
शेतकऱ्यांनी पावसाळ्यातील लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. तसेच तीन किंवा पाच दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून जनावरांना त्रास होत असल्यास या जनावरांचे उपचार करून घेणे आवश्यक आहे. सर्व लसीकरण शासकीय पातळीवरून मोफत करण्यात येत आहे
शेतकऱ्यांनी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे : डॉ. दिनकर बोडरे
सध्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाळ्यात जनावरांना अनेक आजार होण्याची शक्यता असते. पशू संवर्धन विभागाकडून पावसाळ्यापूर्वीच घटसर्प, लम्पि या आजारावर असलेल्या लसींची लसीकरण मोहीम पूर्ण घेण्यात आलेली आहे. ज्या जनावरांचे लसीकरण करण्यात आलेले नाही त्या पशुपालकांनी आपलया जनावरांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. जेणेकरून जनावरांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा आजार उध्दभवणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनावराचे लवकर लसीकरण करून घ्यावे असे, आवाहन केले असल्याची माहिती पशु संवर्धन विभागाचे उपयुक्त डॉ. दिनकर बोडरे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.