सातारा प्रतिनिधी | ‘गणपती बापा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, बाप्पा निघाले गावाला… चैन पडेना आम्हाला’, अशा जयघोषात फुलांची उधळण करत, पारंपरिक वाद्यांच्या निनादात, ढोल-ताशांच्या गजरात अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला आणि अनंत चतुर्दशी दिवशी जिल्ह्यातील सुमारे 800 हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले.
सातारा शहरातील 64 सार्वजनिक मंडळांचा त्यामध्ये समावेश आहे. तर 26 हजार घरगुती बाप्पांनाही भक्तिभावाने निरोप देण्यात आला. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या.
शहरातील बहुतांश मंडळांनी सोमवारी आणि मंगळवारी डीजेला फाटा देत पारंपारिक वाद्याच्या निनादात ढोलताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुका काढल्या. गुलालाची उधळण करण्यात आली. विसर्जन मार्गांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मिरवणुकीसाठी विविधरंगी फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलींचा वापर करण्यात आला. मिरवणुकीच्या अग्रभागी बँड पथक, ढोल ताशा पथकासह महिला मिरवणूक मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालत होत्या.