सातारा प्रतिनिधी | आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर त्याला निरोप देण्याची तयारी सुरू केली आहे. प्रथेप्रमाणे आज बुधवार, दि. २७ रोजी सातारा शहरातील ५० सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे.
दरम्यान, साताऱ्यात सार्वजनिक मूर्तीबरोबरच उद्या घरगुती गणेशाचेही विसर्जन होणार असून, त्यासाठीची तयारी पोलिस प्रशासनासह सातारा पालिकेने केली आहे. याचबरोबर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही साताऱ्यात तैनात करण्यात येत आहे.
उत्साही आणि जल्लोषी वातावरणात गणरायाची आराधना करणाऱ्या अनेक सातारकरांनी प्रथेप्रमाणे पाचव्या दिवशी घरगुती गणेशाचे विसर्जन केले. घरगुती गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर सार्वजनिक गणेश मंडळांनी उभारलेले देखावे आणि साकारलेल्या मूर्ती पाहण्यासाठी सातारकरांची मोठी गर्दी होत आहे. प्रथेप्रमाणे यंदाही नवव्या दिवशी साताऱ्यातील पन्नास सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन होत आहे. यासाठी काढण्यात येणाऱ्या विसर्जन मार्गाची पालिकेने दुरुस्ती केली आहे.
मोती चौक, कमानी हौद, शेटे चौक, पाचशेएक पाटी चौक, सम्राट चौकमार्गे हीमिरवणुकीतील गणेशमूर्ती मुख्य विसर्जन मार्गावर येणार आहे. मोती चौक, समर्थ टॉकीज, राधिका टॉकीजमार्गे गणेशमूर्ती विसर्जनासाठी बुधवार नाका येथील विसर्जन तलावाकडे मार्गस्थ होणार आहे. या मार्गावर भाविकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी मिरवणूक तसेच विसर्जन मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किंग करण्यास मनाई केली आहे.