सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात कोल्हापूर परिक्षेत्रात कोट्यवधींच्या रोकडसह दागिने, मद्यसाठा, अंमली पदार्थांसह २० कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी माध्यमांना दिली आहे.
पावणे सात कोटींची रोकड जप्त
विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्यापासून ते १० नोव्हेंबरपर्यंत कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमध्ये ६.६४ कोटी रूपयांची रोकड, २.८३ कोटी रुपये किंमतीची दारु, १९३ किलो गांजा, ७.५७ कोटीचे ९ किलो सोने आणि ६० किलो चांदी, १.८७ कोटी रूपये किमतीचा गुटखा, असा एकूण १९.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.
२३ पिस्टल, ३६ काडतुसे जप्त
निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या कलमान्वये हजारो संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच २३ पिस्टल आणि ३६ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली. तसेच कोल्हापूर परिक्षेत्रात आचारसंहिता भंगाचे १० दखलपात्र आणि १५ अदखलपात्र गुन्हे दाखल झाले असल्याचंही त्यांनी सांगितल.
नार्कोटिक्स विभागाच्या श्वानाकडून वाहनांची तपासणी
कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली व सोलापूर ग्रामीण या तीन जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याच्या सीमेजवळ आहेत. त्यामुळे तीन जिल्ह्यात एकूण ३६ सीमा तपासणी नाके दिवस रात्र सुरू आहेत. तसेच या नाक्यांवर नार्कोटिक्स विभागाच्या श्वानाचा वापर करण्यात येत आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई, उपद्रवी संशयितांवर कारवाई, अजामीनपात्र वॉरंटची बजावणी, कोबिंग ऑपरेशन, संवेदनशील भागात रुट मार्च सारखी कार्यवाही सुरु असल्याचंही विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सांगितलं.