सातारा प्रतिनिधी– पवार कुटुंबातील भांडण वैचारिक असून शरद पवार (Sharad Pawar) राजकारण सोडून घरी थांबतील पण, भाजपबरोबर कधीही जाणार नाहीत. तरीही ते भाजबरोबर गेले तर मी त्यांच्याविरोधात जाईन, असा इशारा उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने (Laxman Mane) यांनी दिला. आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. आमची संघटना आघाडीबरोबर आहे. त्यामुळे आघाडीने आम्हाला लोकसभेची एक आणि विधानसभेच्या सहा जागा द्याव्यात, अन्यथा आम्ही स्वतंत्र लढू, अशी घोषणाही त्यांनी सातार्यातील पत्रकार परिषदेत केली.
भटक्या विमुक्तांच्या हक्कासाठी शोधयात्रा
भटक्या विमुक्तांच्या हक्कासाठी 14 ऑक्टोबरपासून राज्यात शोधयात्रा काढणार असल्याचे भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष उपराकार लक्ष्मण माने यांनी सांगितले. भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या बैठकीत भटक्या विमुक्तांच्या न्याय, हक्कासाठी आणि लोकशाही संविधानाचा शोध घेण्यासाठी 14 ऑक्टोबरपासून राज्यात शोधयात्रा सुरू करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यातून यात्रेला सुरुवात होईल आणि 6 डिसेंबर रोजी मुंबईत यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती माने यांनी दिली.
उपराकार माने म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही समाज उपेक्षितांचे जगणे जगत आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला भटक्या विमुक्तांचे प्रश्न सुटावेत, असे मनापासून वाटलेले नाही. म्हणूनच आम्ही महाविकास आघाडीकडे लोकसभेची लातूर किंवा यवतमाळ या जागेची मागणी करणार आहोत. तसेच विधानसभेचे सहा मतदारसंघ आम्हाला हवे आहेत. प्रादेशिक विभागातील कोणतेही सहा मतदारसंघ दिले तर आमचे लोकप्रतिनिधी निवडूण येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यात काढण्यात येणार्या शोध यात्रेदरम्यान भाजपला मतदान करु नका, असे जनतेला आवाहन करणार आहोत. आरएसएसच्या विचारधारेने देशाचे नुकसान केलेले आहे. देशातील हे सरकार घालविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. देशातील या सरकारने पुढील निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी, ही आमची मागणी राहणार असल्याचेही लक्ष्मण माने यांनी स्पष्ट केले.