कराड प्रतिनिधी | भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकारी दोन्तुला जेनित चन्द्रा हे परिविक्षाधीन अधिकारी म्हणून पुढील दीड महिना कराड तालुक्याचा कारभार सांभाळणार आहेत. ११ डिसेंबर २००३ ते जानेवारी २०२४ या कालावधीसाठी कराड तहसिलदार पदाचा स्वतंत्र कार्यभार त्यांना देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे IAS चंद्रा यांनी चार्ज घेतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी (आजपासून) कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू होत आहे. या संपात सर्व कर्मचारी सहभागी होणार असून हा संप काम बंद स्वरूपाचा आहे. त्यामुळे चंद्रा यांच्या प्रशिक्षण कार्यकाळाची सुरूवातच कर्मचारी संपाने होत आहे. संपामुळे नागरीकांच्या कामाचा देखील खोळंबा होणार आहे.
चंद्रा यांचं 6 आठवडे प्रशिक्षण
भारतीय प्रशासन सेवा प्रशिक्षणाचा भाग म्हणून म्हणून त्यांना ६ आठवडे कराड तहसिलदार पदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे. कराडचे तहसीलदार विजय पवार यांना वरील कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज देण्यात आले आहे.
विजय पवार दीड महिन्यांनी घेणार चार्ज
प्रशासकीय आदेशानुसार देण्यात आलेला कालावधी संपताच मुळ नियुक्तीच्या पदावर म्हणजेच तहसिलदार कराड या पदावर विजय पवार हे हजर होणार आहेत. तसेच त्यांचे वेतन व इतर भत्ते मुळ नियुक्तीच्या ठिकाणी अदा केले जाणार आहेत.
चंद्रांमुळे पी. अल्बनगन यांची आठवण
कराड प्रांत कार्यालयात २००१-०२ च्या दरम्यान पी. अल्बनगन नावाचे टेक्नोसॅव्ही प्रांताधिकारी होते. त्यांच्याच कार्यकाळात महसूल विभागात संगणकीकरणाला सुरुवात झाली होती. सामान्यांची कदर करणारा अधिकारी, अशी त्यांची प्रतिमा होती. बऱ्याच काळानंतर चंद्रा यांच्या रूपाने तरुण अधिकारी प्रोबेशनवर कराडला आला आहे. त्यामुळे पी. अल्बनगन यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.