‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिव्हल 2025 चे थाटात उदघाटन!

0
47

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पाचगणीत ‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिव्हलची आज दि. १७ रोजी विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी केलेल्या जल्लोषात आणि स्थानिक नागरिकांच्या प्रतिसादामध्ये शानदार सुरुवात झाली. या फेस्टिवलचे उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल जाधव, पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री फुलवा खामकर, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, दै. प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे, जाहिरात व्यवस्थापक प्रशांत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलनानंतर मान्यवरांची मनोगते झाल्यावर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या कार्यक्रमाला पाचगणी व पाचगणीबाहेरून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कलागुणांचे प्रदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये अवकाशातून पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून आतषबाजी करण्यात आली व पॅराग्लायडिंगमधून विविध रंगांची उधळण करण्यात आली.

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पाचवड येथून आलेल्या ‘आपुलकी’ या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विद्यालयाने सादर केलेले नृत्य या कार्यक्रमाचा आकर्षण बिंदू ठरला. सर्व रसिक या विद्यार्थ्यांच्या नृत्यामुळे मंत्रमुग्ध झाले. पाचगणीसारख्या पर्यटनस्थळाकडे लोकांचे आकर्षण वाढावे, स्थानिकांना रोजगार मिळावा व स्थानिक कलाकारांना आपल्या कलांचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ मिळावं यासाठी या फेस्टिव्हलचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.

पाचगणीसारख्या पर्यटन स्थळी असा फेस्टिव्हल होणे म्हणजे पर्यटक व रसिकांसाठी मेजवानीच आहे. या फेस्टिव्हलसाठी नगरपालिका प्रशासनाकडून सर्व काही सुविधा व सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिले. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व पर्यटकांचा कल पाचगणी- महाबळेश्वरकडे वाढविण्यासाठी पाचगणी फेस्टिव्हल मोलाचा वाटा उचलत आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस सहाय्यक निरीक्षक श्री दिलीप पवार यांनी पाचगणी फेस्टिव्हल साठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून त्याचबरोबर वाहतुकीची व कायद्याची कोणतीही समस्या उदभवणार नाही याबाबत पोलीस प्रशासन लक्ष देईल, अशी हमी दिली.