सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा नुकत्याच एका धक्कादायक घटनेमुळे हादरून गेला आहे. जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असलेल्या कलेढोण या गाव परिसरातील बेघर वस्तीमध्ये बुधवारी रात्री पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. घटना घडल्यापासून अवघ्या दोन तासांतच संशयित आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
मंगल उर्फ सुमन संतोष सखाराम जाधव (वय ३९) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर संतोष सखाराम जाधव (वय ४५) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मुळगाव नसरापूर किल्ले मच्छिंद्र जवळ असलेले व सध्या कलेढोण येथील बेघर वस्तीमध्ये मंगल उर्फ सुमन सखाराम जाधव, पती सखाराम जाधव व दोन मुले असे वास्तव्यास आहेत. त्यातील लहान मुलगा मूळगावी येथे राहिला आहे तर मोठा २१ वर्षाचा मुलगा आई-वडिलांबरोबरच राहतो.
बुधवारी रात्री मंगल सखाराम जाधव व पती सखाराम यांच्यामध्ये शाब्दिक भांडण सुरू होते. ‘तुला ठेवतच नाही, तुला मारूनच टाकतो’ अशा स्वरूपाचे शाब्दिक भांडण सुरू होते. मात्र गुरुवारी पहाटे साडेपाच सहाच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. पहाटे फिरायला जाणाऱ्या मंगल जाधवच्या भावाने दरवाजा उघडा आहे म्हणून घरात पाहिले असता बहीण मंगल मृतावस्थेत पडली असल्याचे लक्षात आले. खून झाल्याची घटना घडली असल्याची माहिती पोलिस पाटील सचिन शेटे यांना मिळाली. त्यानंतर शेटे यांनी घटनास्थळी जाऊन प्राथमिक माहिती घेतल्यानंतर पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे व सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत पाटील यांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच हे दोन्ही अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
या ठिकाणची परिस्थिती व परिसरातील माहिती घेऊन खुनाचा संशयित आरोपी पती सखाराम जाधव असावा, असा अंदाज बांधून त्यांनी तत्काळ संशयित आरोपीला पकडण्यासाठी हालचाली सुरू केल्या. दोन तासांच्या आतच त्याला सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथून पकडण्यात पोलिसांना यश आले. गुरुवारी दिवसभर या घटनेची माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.