सातारा प्रतिनिधी । साताऱ्यात डंपर आणि मोटरसायकलच्या भीषण अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना शुक्रवारी लिंब खिंडीजवळ घडली. रामचंद्र रघुनाथ उर्फ बाबू खादगे (वय ५०, रा. लिंब, ता. सातारा), असे मृताचे नाव आहे. त्यांच्या पत्नी कल्पना रामचंद्र खादगे या गंभीर जखमी आहेत. लिंबवरून साताऱ्याला येत असताना सेवा रस्त्यावर समोरून भरधाव आलेल्या डंपरने मोटरसायकला जोरदार धडक दिली. बाबू खादगे हे सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिध्द व्यापारी होते.
बाबू खादगे हे पत्नीसोबत मोटरसायकलवरून लिंबहून सातारला येत होते. नागेवाडी फाट्याकडून सेवा रस्त्याने येत असताना समोरून आलेल्या भरधाव डंपरने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. धडक देवून डंपर न थांबताच निघून गेला. डंपरची धडक इतकी भीषण होती की त्यात मोटरसायकलचा चक्काचूर झाला. अपघातात डोक्याला गंभीर इजा झाल्याने बाबू खादगे यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी कल्पना गंभीर जखमी झाली. त्यांना उपचारासाठी साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लिंब खिंड परिसरात मोठ्या संख्येने क्रशर आहेत. क्रशरवरील डंपरची संख्या मोठी आहे. डंपर चालकांची त्या परिसरात मुजोरी चालते. सेवा रस्त्यावरूनही डंपर प्रचंड वेगाने धावतान दिसतात. सेवा रस्त्यावर वर्षाला किमान दहा ते पंधरा अपघात होतात. त्यात अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे.
…तर मृतदेह ताब्यात घेणार नाही
डंपर चालकांची मुजारे आणि अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पसार झाल्याने मृताचे नातेवाईक सतप्त तप्त झाले होते. पळून गेलेल्या डपर चालकाला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा खादगे यांचे नातेवाईक व लिंब ग्रामस्थांनी घेतला आहे. अपघाताच्या घटनेनंतर लिंब गावावर शोककळा पसरली. संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.