सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील पुसेसावळीसह परिसरात पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने पुसेसावळी ग्रामस्थांनी वडूज येथे बेमुदत उपोषण सुरु केले होते. मात्र, प्रशासनाच्या लेखी व सकारात्मक आश्वासनानंतर एका दिवसात हे उपोषण मागे घेण्यात आले. प्रशासनाच्या निर्णयानंतर या परिसरातील नागरिकांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
जनावराच्या पिण्याचा व चाऱ्याचा उपलब्धतेसाठी पारगाव तलाव तसेच लक्ष्मीनगर, मांडवे शिवार पुसेसावळी या ठिकाणी उरमोडीचे पाणी विविध मायणरमधून ओढ्यास पाणी सोडण्याच्या मागणीसाठी वडूज येथे शहाजी पाटील, अशोक काका कदम, रवींद्र यशवंत कदम, उदय आनंदराव माळवे, संतोष कृष्णा कदम, सौ. सुजाता सतीश माने, सुशांत सुधाकर गुरव, नामदेव माळी, चंद्रकांत भानुदास खोत व पुसेसावळी परिसरातील ग्रामस्थांनी उपोषण सुरु केले होते.
प्रशासनाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, खटाव तालुक्यामध्ये पाणीटंचाई सुरु आहे. पाणीटंचाई अंतर्गत खटाव तालुक्यामध्ये शिरसवडी, म्हासुर्णे, होळीचागाव, येळीव येथील तलावामधील पिण्यासाठी पाणी सोडण्याबाबत माण-खटाव प्रांताधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.
पारगाव व लाभ क्षेत्रातील गावे व येळीव लाभक्षेत्रातील गावांना पिण्याचे पाणी मिळण्याकरीता तलावामध्ये पाणी सोडण्याची विनंती केली आहे. त्या अनुषंगाने उरमोडी धरण विभागाच्या वडूजच्या कार्यकारी अभियंत्यांना आपल्या निवेदनाच्या अनुषंगाने प्रशासकीय मान्यतेसाठी कार्यवाही सुरु केलेली आहे. आपल्या मागणीच्या अनुषंगाने तातडीने व नियमानुसार उचित कार्यवाही करण्यासाठी कळविले असल्याने आपण उपोषण मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पत्रात केले होते.
26 टँकरव्दारे 30 गावे आणि 106 वाडीवस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा
सध्या तालुक्यामध्ये 26 टँकरव्दारे 30 गावांना व 106 वाडीवस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. या गावांना टँकर भरण्यासाठी शिरसवडी, होळीचागाव, म्हासुर्ण येथे फिडींग पॉइंट तयार करण्यात आले आहेत. तसेच शिरसवडी, म्हासुर्णे व होळीचागाव तलावात अत्यल्प पाणी असल्याने अगदी थोड्या प्रमाणात टँकर भरले जात आहेत.