पुसेसावळी दंगली प्रकरणी पिडीत मुस्लिम समाज बांधवांचा आमरण उपोषणाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पुसेसावळी दंगलीच्या दहा महिन्या नंतर ही निरपारधी होतकरू इंजिनियर मुस्लिम तरुणाच्या हत्याकांडास जबाबदार असणाऱ्या बहुतांश दंगलखोरांना आजपर्यंत अटक झाली नाही. प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत असून फरारी आरोपींना तात्काळ अटक करावी, अन्यथा दि. ८ जुलै पासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचे निवेदन पुसेसावळी मुस्लिम समाजाने खटावच्या प्रांताधिकारी, तहसीलदार यांना दिले आहे.

निवेदनात म्हंटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासणारीं पूर्वनियोजित षडयंत्र रचून पुसेसावळीत (ता.खटाव) येथे १० सप्टेंबर २०२३ रोजी दंगल झाली.प्रार्थनास्थळावर झालेल्या हल्ल्यामध्ये निरपारधी होतकरू नुरुलहसन शिकलगार या इंजिनियर मुस्लिम तरुणाची हत्या करण्यात आली.काही जातीयवादी संघटनांच्या वतीने झालेल्या हल्ल्यात धार्मिक स्थळ, धर्मग्रंथ,निवासी संकुल, वाहने, व्यापार संकुलाची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली. तसेच दहा ते पंधरा जणांना गंभीररित्या जखमी करण्यात आले.

याबाबत मुस्लिम समाजाला अद्याप संपूर्णपणे न्याय मिळालेला नाही तसेच सदर घटनेत मृताच्या कुटुंबियांना जखमींना, नुकसानग्रस्त पीडित गरीब मुस्लिम समाजाला आजपर्यंत कोणतीही सरकारी मदत मिळालेली नाही. समाज माध्यमावर प्रतिक्रिया केल्याचे मात्र छायाचित्र दाखवून गुन्हे दाखल केल्यानंतर खोट्या आरोपामुळे नाहक तीन मुस्लिम तरुणांचे आयुष्य बरबाद झाले आहे. त्यामुळे आम्ही समस्त मुस्लिम बांधव सोमवार दि ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सातारा जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करीत आहोत.

या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक औंध यांना देण्यात आल्या. सदर निवेदनावर जामा मस्जिद ट्रस्ट पदाधिकारी, विश्वस्त तसेच मुस्लिम समाजातील नागरिक आणि महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.