सातारा प्रतिनिधी । जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व प्रकल्प संचालक, आत्मा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात एक दिवसीय हळद पीक जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, हळद पीक उत्पादन काढणीत्तोर हाताळणी प्रक्रिया व पणन यामध्ये संशोधन आणि विकासाच्या माध्यमातून तंत्रज्ञान वापरासाठी प्रोत्साहन मिळावे इत्यादी धोरणे डोळ्यासमोर ठेवून जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये हळद संशोधन केंद्र डिग्रज, येथील तज्ञ मनोज माळी यांनी हळद लागवड तंत्रज्ञान, किड व रोग अंशविरहित हळद उत्पादन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्यानंतर डॉ. जितेंद्र कदम, वरीष्ठ शास्त्रज्ञ अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती यांनी हळद प्रक्रिया तंत्रज्ञान, उत्पादने व विक्रीव्यवस्था या विषयी, संकेत दिवेकर, संचालक साईसिद्ध इंटरनॅशनल नाशिक यांनी आखाती देशातील हळद निर्यात, हळद उत्पादने, मानके, काळजी, बाजारपेठ प्रयोगशाळा तपासण्या या विषयी मार्गदर्शन केले.
यावेळी शंतनु जगताप, सहाय्यक संचालक एम.सी. सी.आय.ए. पुणे यांनी निर्यातदार होण्यासाठी (MCCIA) चे सहकार्य, सुदर्शन नरवडे, राज्य प्रकल्प व्यवस्थापक (PMFME) पुणे यांनी हळद प्रक्रिया पदार्थाचे पॅकेजिंग, पॅकिंग, मार्केटिंग व ब्रॅडिंग अशा विविध विषयांवर सविस्तर व सखोल माहिती दिली. तसेच राजेंद्र गायकवाड, संदिप कोरडे, रवी कोरडे, भुषण डेरे या अनुभवी शेतकऱ्याचे अनुभव कथन केले. प्रशिक्षण स्थळी हळद पिकांच्या विविध प्रजाती, कीड व रोग याबाबतची माहिती दर्शविणारे प्रदर्शन देखील ठेवणेत आले होते.
प्रशिक्षण कार्यक्रमा दरम्यान शेतकऱ्यांनी प्रश्नोत्तरामध्ये विचारलेल्या सर्व शंकांचे सामाधान करण्यात आले. शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त व प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर हळद पिकावर प्रशिक्षण कार्यक्रम राबविणेत आलेबाबतची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.