कराड प्रतिनिधी । ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आयोगाने पिपाणी चिन्ह न हटवण्याचा निर्णय घेतला असला तर हा निर्णय शरद पवारांनी (Sharad Pawar) देखील मान्य केला आहे. लोकसभा निवडणूकीत पिपाणी चिन्हाने लाखो मतं घेत तुतारीचं टेंशन वाढवलं होतं. मात्र, आता निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह हटवण्याची मागणीच फेटाळून लावल्याने तुतारी वाजवणारा माणूस लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आणि लोकसभेत बसलेला फटका टाळण्यासाठी पवार काय रणनीती आखणार? साताऱ्यात नेमकं ते काय करणार? यावर विजयाचं गणित अवलंबून असेल. पिपाणीमुळे तुतारीचं टेंशन वाढलंय एवढं मात्र नक्की..
लोकसभा निवडणूकीत पिपाणीमुळे तुतारीला मोठा फटका बसला असल्यामुळे विधानसभेला चिन्हांच्या यादीतून पिपाणी हटवण्याची मागणी शरद पवारांच्या पक्षाने केली होती. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, विधानसभेसाठी निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या पक्षाची मागणी फेटाळून लावलयामुळे विधानसभेला पिपाणीने तुतारीचं टेंशन वाढवलं असला तरी शरद पवारांनी काही काळजी ना करण्याचे म्हटलेले आहे. परिणामी साताऱ्यात आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारीच्या प्रचारासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे. कारण शरद पवारांच्या उमेदवाराचा 32 हजार मतांनी पराभव झाला असल्याचे लोक आजही विसरलेले नाही.
कराडात शरद पवारांचे तुतारी अन् पिपाणीत गफलत न करण्याचे आवाहन
कराड येथे खासदार शरद पवार यांनी माध्यमांशी काल संवाद साधला. यावेळी त्यांनी साताऱ्यात लोकसभा निवडणुकीमध्ये आमचे चिन्ह स्पष्ट नव्हते. परंतु यावेळेस विधानसभा निवडणुकीत ते चिन्ह अत्यंत स्पष्ट आहे. त्यामुळे निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी चिन्हांमध्ये गफलत न होता पिपाणीचा कोणताही प्रकारे फटका बसणार नाही, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.
बीड ते सातारा! मतदारांनी ‘तुतारी’सोबत पिपाणी’ही वाजवली
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी जोरदार कामगिरी केली. या निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्रात सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. ठाकरे यांची शिवसेना तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या. दरम्यान, शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराला पिपाणी या निवडणूक चिन्हामुळे अनेक जागांवर मतफुटीचा फटका बसल्याचे पहायला मिळाले.
साताऱ्यात लोकसभेला कोणाला किती मतं मिळाली?
साताऱ्यात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत झाली. उदयनराजे यांना एकूण 5 लाख 71 हजार 134 मतं पडली. त्यानंतर पवार यांच्या पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना 5 लाख 38 हजार 363 मतं पडली. म्हणजेच शिंदे यांचा 32 हजार 771 मतं कमी पडली. दुसरीकडे याच मतदारसंघात पिपाणी हे निवडणूक चिन्ह असणाऱ्या संजय गाडे या अपक्ष उमेदवाराला 37 हजार 62 मते मिळाली.
पवारांनी निवडणूक आयोगास पाठवलेल्या पत्रात काय म्हटलंय होत?
लोकसभेला पिपाणी चिन्हामुळे जो फटका बसला. तो विधानसभेला बसू नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दक्षता म्हणून निवडणूक आयोगाला आयोगाला पत्र पाठवले होते. त्या पत्रात पवारांनी फ्री सिम्बॉलमधून पिपाणी चिन्ह वगळण्याची विनंती करण्यात आली असून फ्री सिम्बॉल मध्ये पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचा समावेश असल्यामुळे अडचणी येत असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. तसेच याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचेही पत्रात म्हटले.
पिपाणी चिन्ह असणाऱ्यांना लोकसभेला मतं किती?
पिपाणी या चिन्हामुळे मतं फुटली असल्याचे सांगतात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने रावेर, दिंडोरी, भिवंडी, बारामती, शिरुर, अहमदनगर, बीड, सातारा या जागांवर पिपाणी या चिन्हांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या मतदाची आकडेवारी सांगितली होती. आकड्यांत सांगायचे झाल्यास रावेर या जागेवर पिपाणी चिन्हावर निवडणूक लढवणारे एकनाथ साळुंके यांना 43 हजार 957 मतं पडली आहेत. त्याच प्रमाणे दिंडोरी या जागेवरून बाबू भगरे (सर) यांना 1 लाख 3 हजार 632 मते पडली आहेत. भिवंडी जागेवर कांचन वखरे यांना 24 हजार 625 मते मिळाली. बारामती या जागेवर शेख सोएलशहा यांना 14 हजार 917 मते पडली आहेत. शिरुरमध्ये मनोहर वाडेकर यांना 28 हजार 324, अहमदनगरमध्ये गोरख आळेकर यांना 44 हजार 597, बीडमध्ये अशोक थोरात यांना 54 हजार 850 मते, साताऱ्यात संजय गाडे यांना 37 हजार 62 मते पडली आहेत.