कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यात वर्षभरात सिलिंडरच्या स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, वर्षाच्या अखेरीस कराड तालुक्यातील विंग येथे घरगुती सिलिंडरचा स्फोट झाल्याची दुर्घटना रविवारी घडली. या दुर्घटनेत घरासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. यात सुमारे 7 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील विंग येथील पाणंद परिसरात तानाजी कणसे यांच्या घरात रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास स्वयंपाक घरातून अचानक धूर निघू लागला. काही क्षणात सिलिंडरचा स्फोट झाल्याने गॅसची टाकी २५ फूट हवेत उडून मोठा आवाज झाला.
प्रसंगावधान राखत तानाजी कणसे, पत्नी सुरेखा, मुलगी रेणुका, मुलगा पीयूष, आई सुभद्रा, बहीण सखूबाई यांनी घराबाहेर धाव घेतली. काही वेळातच घरात आग लागल्याने यात संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपड्यांनी पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप घेतले. दरम्यान, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, कऱ्हाड पालिका अग्निशामक दलाला पाचारण केले. तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, रोख रकमेसह सोने, धान्य, टीव्ही, फ्रिज, पिठाची चक्की, कपडे जळून खाक झाले. गावकामगार तलाठी फिरोज अंबेकरी, क्लार्क संजय पाटील व अमोल चव्हाण यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. सात लाखांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली. आग विझविण्यासाठी चंद्रकांत होगले, दीपक मोकाशी, शुभम कणसे, बाबासाहेब होगले, विजय कणसे, धनाजी कणसे, राजू कणसे, तुषार यादव, अजय होगले, सूचित कणसे, वसंत कणसे, आनंदा कणसे आदीनी परिश्रम घेतले.