कराड प्रतिनिधी | तासवडे, ता. कराड येथील टोलनाक्यावर स्थानिकांच्या वाहनांकडून घेण्यात येणारा टोल त्वरित थांबवण्यात यावा, यासाठी उंब्रज परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. टोलनाका व्यवस्थापनाला ग्रामपंचायत व नागरिकांच्यावतीने आज, दि. 7 रोजी सकाळी 11:30 वाजता निवेदन देण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच योगराज जाधव यांनी केले आहे.
तासवडे टोलनाक्यावर स्थानिकांच्या वाहनांना टोल आकारला जात असल्याच्या मुद्द्यावर शनिवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. माजी उपसरपंच पै. अजित जाधव, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.
यावेळी योगराज जाधव म्हणाले, तासवडे टोल नाक्याचे व्यवस्थापन बदलल्यापासून स्थानिकांच्या वाहनांना टोल आकारला जात आहे. पास काढण्यासाठी तगादा लावला जात आहे. फास्टॅगमधून टोलची रक्कम वसूल केली जात आहे. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी उंब्रज परिसरातील वाहनधारकांनी आपापली वाहने घेऊन सकाळी 11:30 वाजता मार्केट यार्ड येथे यावे. तेथून तासवडे टोलनाका येथे निवेदन देण्यासाठी एकत्रित जायचे आहे.