घंटागाडी चालकांचे साताऱ्यातील हुतात्मा स्मारक परिसरात काम बंद आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | किमान वेतन कायद्याप्रमाणे पगाराची मागणी करणार्‍या तीन घंटागाडी चालकांना संबंधित ठेकेदाराने कामावरून अचानक कमी केल्याने, संतप्त घंटागाडी चालकांनी हुतात्मा स्मारक परिसरात शनिवारी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे सकाळच्या सत्रात एकही गाडी बाहेर न पडल्याने शहराच्या काही भागात कचरा संकलन होऊ शकले नाही.

सातारा पालिकेने कचरा संकलनाचा ठेका स्वातंत्र्यवीर सावरकर मजूर सेवा संस्थेला दिला आहे. शहरात घंटागाड्यांमून दररोज 48 ते 52 टन कचरा संकलन केले जाते. नगरपालिकेच्या 40 घंटागाड्या आहेत. संबंधित ठेकेदाराने घंटागाडीचालकांना किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार देणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही चालकांना कमी पगार मिळाल्याने, त्यांनी तक्रार केली होती. त्यामुळे ठेकेदाराने या चालकांना कामावरून अचानक कमी केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संतप्त घंटागाडीचालकांनी हुतात्मा स्मारक उद्यान परिसरात काम बंद आंदोलन केले.

या आंदोलनामुळे शहराच्या काही भागात घंटागाड्या न फिरल्याने कचरा संकलन ठप्प झाले. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी ठेकेदार संस्थेचा व्यवस्थापक उपलब्ध होऊ शकला नाही. या प्रकरणाची दखल पालिका प्रशासनाने घेतली आहे. तातडीने कचरा संकलनासाठी घंटागाड्या त्या त्या प्रभागात पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत