सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील एका मोठ्या नामांकित हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाचा वाईच्या धोम धरणात बुडुन मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. मनोजकुमार महेंद्र पाल (सध्या रा. बोंडारवाडी, ता. महाबळेश्वर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाई सोमवार दि. १५ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मनोजकुमार महेंद्र पाल (वय ३२) आणि त्याचा मित्र संदीप बापु शिंदे (वय २७) दोघेही (रा. बोंडारवाडी, ता. महाबळेश्वर) हे आपल्या दुचाकी वरुन वाई येथील धोम धरण पाहण्यासाठी आले होते. पण दुपारच्या वेळी कडक ऊन्हाची तिव्रता असल्याने हे दोघेही व्याहळी गावच्या हद्दीत असणाऱ्या धोम धरणात पोहण्यासाठी ऊतरले होते. मात्र, या ठिकाणच्या पाण्याचा तसेच साठलेल्या गाळाचा दोघांनाही अंदाज न आल्याने पाण्यात उडी टाकली. यावेळी मनोजकुमार पाल हा गाळात अडकल्याने तो गाळात खोलवर गेला. तो बराच वेळ वर न आल्याने शिंदे यांनी मदतीसाठी इतरांना गोळा करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक जितेंद्र शहाणे यांना मिळताच त्यांनी याची त्या विभागाचे बिट अंमलदार असलेले श्रीनिवास बिराजदार यांना माहिती दिली.
माहिती मिळाल्यानंतर बिट अंमलदार घटना स्थळावर पोहचले आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने मनोजकुमारचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. पण मनोजकुमार हा मिळुन आला नाही. रात्र झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली.
मंगळवार, दि. १६ रोजी बीट अंमलदार श्रीनिवास बिराजदार हे पहाटेच घटना स्थळावर पोहचून पुन्हा शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी मनोजकुमार महेंद्र पाल याने ज्या ठिकाणी उडी टाकली. त्या ठिकाणी बोटक्लब चालक भोसले यांना सोबत घेऊन बिराजदार मनोजकुमारच्या मृतदेहापर्यंत पोहचले.
हा मृतदेह खोलवर गाळात अडकला असल्याने त्यास दोरीच्या साह्याने बिराजदार यांनी बाहेर काढून त्याचा पंचनामा करुन तो शवविच्छेदनासाठी वाईच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेबाबत फिर्याद संदीप बापु शिंदे (रा. बोंडारवाडी ता. महाबळेश्वर) यांनी वाई पोलिस ठाण्यात दिली आहे. याचा अधिक तपास पोलिस निरिक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार श्रीनिवास बिराजदार हे करीत आहेत.