कराड प्रतिनिधी । देशपातळीवर दिला जाणारा चौथा राष्ट्रीय जल पुरस्कार हा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मलकापूर नगरपरिषदेस आज प्रदान करण्यात आला. जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार यांचे वतीने आज विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे भारताचे उपराष्ट्रपती महामहिम जयदिप धनखड यांचे प्रमुख उपस्थितीत केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते नगराध्यक्ष नीलम एडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जलशक्ती आणि अन्नराज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल, राज्यमंत्री जलशक्ती आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय बिश्वेश्वर तुडू यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी Best Urban Local Body या आस्थापने अंतर्गत सादर केलेल्या स्पर्धात्मक शहरामध्ये देशातील बहुतांश मोठ्या शहरांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. त्या सर्वामधून देशात ३ या क्रमांकाचा पुरस्कार मलकापूर नगरपरिषदेस जाहिर करण्यात आलेला आहे. या विभागामध्ये प्रथम क्रमांक चंदिगड, द्वितीय क्रमांक इदौर शहराला देण्यात आलेला असून, मलकापूर व सुरत या दोन्ही शहरांना ३ या क्रमाकांचा पुरस्कार विभागून देण्यात आलेला आहे.
याबाबत मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना म्हणाले की, देशामध्ये चंदिगड व इंदौर ही अतिशय नियोजनबद्ध, विकसित झालेल्या व स्वच्छ सव्र्हेक्षण कायम सातत्य राखणारी शहरे आहेत. या शहरांच्या यादीत मलकापूर नगरपरिषदेने आपले समाविष्ठ केले असल्यामुळे मलकापूर शहराच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे. सदरचा पुरस्कार विशेषबाब म्हणजे अर्बन लोकल बॉडीज् या घटकांतर्गत प्राप्त झाला असून हे यश मलकापूर नगरपंचायत २००९ ते नगरपरिषद २०२३ अंतर्गत काम केलेल्या सर्व पदाधिकारी, नगरसेवक व नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी यांचे आहे.
मलकापूर नगरपरिषदेने सन २००९ साला पासून २४x७ नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वि ठेवली असून गेली सलग १५ वर्षे अखंडितपणे हि योजना सुरु असून मलकापूर शहरातील नागरीकांना स्वच्छ पाणी पुरवठा केला जात आहे. सदर २४X७ नळ पाणी पुरवठा योजनेस सन २०११ चे नॅशनल अर्बन वॉटर अॅवार्ड व पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सदरची योजना देशामधील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना पथदर्शी प्रकल्प असल्याचे उपनगराध्यक्ष शिंदे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना सांगितले.
मलकापूर नगरपरिषदेने सदरचे प्रकल्प कार्यान्वित केल्यापासून यामध्ये कायम सातत्य राखले आहे. याची केंद्र शासनाचे जलशक्ती मंत्रालयाकडून पाहणी केली असून केंद्र शासनाचे जलशक्ती,नदी विकास आणि गंगा पुर्नरुज्जीवन मंत्रालय,भारत सरकार यांचेकडून नॅशनल अर्बन वॉटर अॅवार्ड पुरस्कार नामांकणासाठी देशामधून वेगवेगळ्या ११ आस्थापनांकडून प्रस्ताव मर्ढेकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे माजी सदस्य सचिव आर. जी. होलाणी,
माजी शाखा अभियंता यु.पी. बागडे, पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता श्रीमती प्रिया तारळेकर,जलअभियंता,आत्माराम मोहिते, नगर अभियंता शशिकांत पवार, विद्युत अभियंता अमित महाडीक, लेखापाल सौ. सुनंदा शिंदे,वरिष्ठ लिपिक ज्ञानदेव साळुंखे, श्रीकृष्ण शिंदे अभियंता व शहर समन्वयक पुंडलिक ढगे तसेच रविंद्रनाथ टेळे अभियंता, प्रायमुव्ह इंन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कन्सलटंट व पाणी पुरवठा व आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत.
विशेष करुन माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराज देसाई, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी मंत्री तथा आमदार राजेंद्र मुळक, आमदार विश्वजीत कदम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उदयसिंह पाटील तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांनी अबिनंदन केले.