सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगड येथे असलेले बुरूज ढासळन्याच्या घटना आपण अनेकवेळा एकल्या असतील. अनेक ठिकाणचे दगड देखील अधूनमधून निघाले आहेत. या किल्याच्या सवर्धनाचे काम सध्या हाती घेण्यात आले असून किल्ल्यावरील ध्वज बुरुजाच्या मुख्य भागाची डागडुजी सुरू आहे. मात्र, काम करत असताना कडाप्प्याचा वापर केला जात आहे. यामुळे किल्ल्याचे सौंदर्य लोप पावत आहे. यामुळे इतिहासप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात असून, काम सोमवारी बंद पाडले आहे.
सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत असलेला किल्ले प्रतापगड आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत आहे. ऊन, वारा, मुसळधार पाऊस अंगावर झेलत तो आजही दिमाखात उभा आहे. या किल्ल्याच्या बुरुजाचे दगडेगोटे अधूनमधून पडत आहेत. वास्तविक पाहता पुरातत्व विभागाच्या नियमानुसार ऐतिहासिक वारसा जपायचा असेल तर ती वास्तू ज्या पद्धतीत बांधली असेल त्याप्रमाणेच दुुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यामध्ये कोठेही आधुनिकता येता कामा नये. तरीही प्रतापगडाचे काम करत असताना संबंधित ठेकेदार अन् मजूरांकडून कडाप्पा बसवण्यात येत असल्यामुळे किल्ल्याचे मुख्य सौंदर्यच लोप पावन्याच्या मारगावार आहे.
चुकीच्या पद्धतीने बांधकाम सुरू असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिवप्रेमींनी धाव घेऊन ते काम बंद पाडले. या कामाचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. किल्ले प्रतापगड हा जागतिक वारसास्थळाच्या नामांकन यादीत आहे. त्यामुळे किल्ले प्रतापगडावर होणारी सर्व कामे पुरातत्व विभागाच्या माध्यमातून होण्याची गरज आहे. किल्ले प्रतापगडाची मुख्य ओळख असणाऱ्या ध्वज बुरुजाचे काम मागील दोन वर्षांपासून सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकवर्गणीतून करण्यात येत आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने खासगी ठेकेदार नेमण्यात आला आहे. या ठेकेदाराकडून नियमबाह्य काम केले जात असल्यामुळे ग्रामस्थ तसेच शिवप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे.