सातारा प्रतिनिधी । लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेल्या वाघनखांना ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे (Tiger Claws) राजधानी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Museum Satara) ठेवण्यात आली होती. या ऐतिहासिक वाघनखांनी रविवारी राजधानीचा निरोप घेतला. रवावी सकाळी नऊ वाजता मोठ्या पोलीस बंदोबस्तात वाघनखे नागपूरच्या दिशेने रवाना झाली. तब्बल 4 लाख 30 हजारांहून अधिक शिवप्रेमींनी वाघनखांचे (Waghnakhe) दर्शन घेतले.
महाराष्ट्रातील ‘या’ चार शहरांमध्ये वाघनखांचा वारसा
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं जी राज्यात आली आहे ती सध्या सातारा येथे होती, ही वाघनखं सातारा, कोल्हापूर, मुंबई आणि नागपूर या 4 शहरात प्रदर्शित केली जाणार असल्याचं ठरलं असून साताऱ्यातून आता नागपुरात ही वाघनखं जातील. त्यानंतर कोल्हापूर, मुंबईमध्ये वाघनखांचे जतन केले जाईल. पुरातत्व विभाग व राज्य शासनाने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार ही ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यातील मुक्कामानंतर 1 फेब्रुवारी ते 2 ऑक्टाेबर 2025पर्यंत नागपूर येथे व त्यानंतर 3 ऑक्टोबर ते 3 मे 2026पर्यंत ती कोल्हापूर येथील संग्रहालयात पाहण्यासाठी ठेवली जाणार आहेत.
वाघनखांची कथा काय?
छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या ‘शिवाजी अँड हिज टाइम्स’ या पुस्तकानुसार ही घटना 1659 साली घडली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काम करावे, मांडलिकत्व पत्करावं म्हणून विजापूर संस्थानाचा राजा आदिल शाह याने अफझलखानाला शिवाजी महाराजांकडे पाठवले होते. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या दोन निष्ठावंत मावळ्यांना घेऊन भेटीला गेले होते. अफजलखान पाच जणांसह तेथे आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना अफझलखानाच्या हेतूबद्दल आधीच संशय आला होता आणि त्यामुळेच ते पू्र्ण तयारीनिशी आले होते. अफझलखानाने छत्रपती शिवाजी महाराजांना मिठी मारण्याच्या बहाण्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. असा काही हल्ला होऊ शकतो, याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांना आधीच कल्पना होती. अफझल खानाने मिठी मारण्याच्या बहाण्याने हल्ला करताच शिवाजी महाराजांनी ताबडतोब आपले खास शस्त्र वाघनखे काढून अफझलखानाला ठार केले.
वाघनखे काय आहे?
आपण ज्या वाघनखांबद्दल आतापर्यंत एकात आलो आहोत त्या वाघनखांबद्दल सांगायचे झाले तर वाघनखे हे मजबूत धातूपासून बनवलेले शस्त्र आहे, ज्यात वाघाच्या पंजाच्या नखांप्रमाणे धारदार दांडके जोडलेले असतात. ती व्यक्तीच्या हाताच्या मुठीत बसते. याच्या दोन्ही बाजूंना अंगठी असते जी हाताच्या पहिल्या आणि चौथ्या बोटात घातली जाते. यामुळे ते हातात बसते. यानंतर, हल्ला केल्यावर समोरच्या व्यक्तीला रक्तस्त्राव होतो. यातून कुणाचा खूनही होऊ शकतो. असे म्हणतात की, शिवाजी महाराज हे खास शस्त्र आपल्या सुरक्षिततेसाठी नेहमी स्वतः जवळ ठेवायचे.
शिवाजी महाराजांची वाघनखे भारतातून ब्रिटनपर्यंत कशी पोहोचली?
एका वृत्तानुसार, शिवाजी महाराजांचे हे खास शस्त्र स्वातंत्र्यापूर्वी मराठा राज्याची राजधानी असलेल्या सातारा येथे होते. इंग्रज भारतात आल्यानंतर मराठा पेशव्यांच्या पंतप्रधानांनी ते ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी जेम्स ग्रँट डुप यांना भेट म्हणून दिले. यानंतर, जेव्हा अधिकारी 1824 मध्ये ब्रिटनला पोहोचले, तेव्हा त्यांनी ते व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाला दान केले.