सातारा प्रतिनिधी । लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेल्या वाघनखांना ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे राजधानी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, चार महिन्यांमध्ये राज्यभरातील सुमारे दोन लाख शिवप्रेमींनी संग्रालयास भेट दिली आहे. तसेच या शिवप्रेमींनी ऐतिहासिक वाघनखांसह शिवकालीन शस्त्र व अन्य वस्तूंचा इतिहासही जाणून घेतला आहे.
साताऱ्यातील मार्केट यार्ड येथे १९६६ साली छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या उभारणीचा मुहूर्त झाला व १९७० रोजी या संग्रहालयाचे काम पूर्णत्वास आले; परंतु वस्तू संग्रहालयासाठी ही जागा अपुरी पडू लागल्याने बसस्थानकाशेजारी असलेल्या हजेरी माळावर संग्रहालयाची नूतन इमारत उभी राहिली. याच इमारतीत लंडन येथील व्हिक्टोरिया अॅन्ड अल्बर्ट म्युझियममधील ऐतिहासिक वाघनखे पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहेत.
राज्य शासनाने लंडन येथील म्युझियमशी तीन वर्षांचा करार केला असून, वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात राहणार आहे. ही वाघनखे भारतात दाखल झाल्यानंतर ती सर्वप्रथम स्वराज्याच्या राजधानीचा मान मिळालेल्या साताऱ्यात आणण्यात आली. १९ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन करून शिवप्रेमींसाठी खुले झाले.
संग्रहालयात वाघनखांसह साताऱ्याचे तख्त, स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांची नाममुद्रा, भाले, तलावारी, कट्यार, चिलखत, बंदुका, चांदी व सोन्याच्या मुद्रा आदी वस्तू पाहण्यासाठी मांडण्यात आल्या आहेत. शस्त्र प्रदर्शन सुरू झाल्यापासून शालेय विद्यार्थ्यांसह राज्यभरातील नागरिक तसेच शिवप्रेमी संग्रहालयाला भेटी देत आहेत. गेल्या चार महिन्यांत सुमारे दोन लाख नागरिकांनी संग्रहालयास भेट दिली असून, येथील वाघनखे व शस्त्रास्त्रांचा इतिहास जाणून घेतला.
ऐतिहासिक वाघनखे ‘या’ तारखेपर्यंत साताऱ्यात असणार
चार महिन्यांपूर्वी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखे दाखल झाली. या वाघनखांचे व संग्रालयातील प्रदर्शनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत थाटात उदघाटन देखील झाले. त्यानंतर हि वाघनखे सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली. मात्र, ऐतिहासिक अशी हि वाघनखे ३१ जानेवारी २०२५ पर्यंतच नागरिकांना येथे पाहता येणार आहे. यानंतर वाघनखे नागपूर येथील संग्रहालयात पाठविली जाणार आहेत.
वाघनखांची कथा काय?
छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या ‘शिवाजी अँड हिज टाइम्स’ या पुस्तकानुसार ही घटना 1659 साली घडली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काम करावे, मांडलिकत्व पत्करावं म्हणून विजापूर संस्थानाचा राजा आदिल शाह याने अफझलखानाला शिवाजी महाराजांकडे पाठवले होते. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या दोन निष्ठावंत मावळ्यांना घेऊन भेटीला गेले होते. अफजलखान पाच जणांसह तेथे आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना अफझलखानाच्या हेतूबद्दल आधीच संशय आला होता आणि त्यामुळेच ते पू्र्ण तयारीनिशी आले होते. अफझलखानाने छत्रपती शिवाजी महाराजांना मिठी मारण्याच्या बहाण्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. असा काही हल्ला होऊ शकतो, याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांना आधीच कल्पना होती. अफझल खानाने मिठी मारण्याच्या बहाण्याने हल्ला करताच शिवाजी महाराजांनी ताबडतोब आपले खास शस्त्र वाघनखे काढून अफझलखानाला ठार केले.
वाघनखे काय आहे?
आपण ज्या वाघनखांबद्दल आतापर्यंत एकात आलो आहोत त्या वाघनखांबद्दल सांगायचे झाले तर वाघनखे हे मजबूत धातूपासून बनवलेले शस्त्र आहे, ज्यात वाघाच्या पंजाच्या नखांप्रमाणे धारदार दांडके जोडलेले असतात. ती व्यक्तीच्या हाताच्या मुठीत बसते. याच्या दोन्ही बाजूंना अंगठी असते जी हाताच्या पहिल्या आणि चौथ्या बोटात घातली जाते. यामुळे ते हातात बसते. यानंतर, हल्ला केल्यावर समोरच्या व्यक्तीला रक्तस्त्राव होतो. यातून कुणाचा खूनही होऊ शकतो. असे म्हणतात की, शिवाजी महाराज हे खास शस्त्र आपल्या सुरक्षिततेसाठी नेहमी स्वतः जवळ ठेवायचे.