लंडनमधील ऐतिहासिक वाघनखे साताऱ्याच्या संग्रहालयात इतिहासप्रेमींना पाहता येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेल्या वाघनखांना ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे राजधानी साताऱ्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या वाघनखांसाठी संग्रहालयात तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र दालनाचे काम अंतिम टप्प्यात असून सुरक्षेची पुरेपूर खबरदारी घेण्यात आली आहे. पुढील महिन्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही वाघनखे साताऱ्यात येणार आहेत.

लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणली जाणार आहेत. वाघनखे भारतात आल्यानंतर ती सातारा, कोल्हापूर व नागपूर येथील संग्रहालयात एक-एक वर्षासाठी ठेवली जाणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून इतिहासप्रेमी या वाघनखांची आतुरतेने वाट पाहत होते; परंतु सुरक्षेसह अन्य कारणांमुळे वाघनखांचा प्रवास लांबणीवर पडला.

व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमकडून वाघनखे ठेवण्यासाठी काही निकष व अटी घालण्यात आल्या. पुरातत्त्व विभागाकडून सर्व निकषांची पूर्तता करण्यात आल्याने वाघनखे भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला. या वाघनखांसाठी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वतंत्र दालन बनविण्यात आले आहे. या ठिकाणी ही वाघनखे दहा महिने ठेवली जाणार असून, इतिहासप्रेमी सातारकरांना ती प्रत्यक्षात पाहता येणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात खास शस्त्र ‘वाघनखे’ लवकरच देशात परत आणण्याची तयारी सुरू आहे. या वाघनखानेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता. वाघनखे गेल्या अनेक दशकांपासून लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये ठेवण्यात आली आहेत. युनायटेड किंगडमच्या अधिकाऱ्यांनी आता ते ‘वाघनखे’ परत करण्याचे मान्य केले आहे.

अशी आहे दालनाची व्यवस्था

१) वस्तुसंग्रहालयात वाघनखांसाठी स्वतंत्र दालन

२) वाघनखे ठेवण्यासाठी विशिष्ट पेटी दिल्ली येथे तयार करण्यात आली

३) पेटीचा खालचा भाग पोलादी व वरील भाग काचेचा पारदर्शक आहे

४) ही काच लॅमिनेटेड व अत्यंत भक्कम अशी आहे

५) या दालनाभोवती सीसीटीव्ही कॅमेरे व बंदूकधारी सुरक्षारक्षक

६) सुरक्षेसाठी वाघनखांच्या पेटीभोवती सेन्सर

७) प्रतापगडावरील शिवपराक्रमाचे दालनातील भिंतीवर रेखाचित्र

वाघनखांची कथा काय?

छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या ‘शिवाजी अँड हिज टाइम्स’ या पुस्तकानुसार ही घटना 1659 साली घडली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काम करावे, मांडलिकत्व पत्करावं म्हणून विजापूर संस्थानाचा राजा आदिल शाह याने अफझलखानाला शिवाजी महाराजांकडे पाठवले होते. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या दोन निष्ठावंत मावळ्यांना घेऊन भेटीला गेले होते. अफजलखान पाच जणांसह तेथे आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना अफझलखानाच्या हेतूबद्दल आधीच संशय आला होता आणि त्यामुळेच ते पू्र्ण तयारीनिशी आले होते. अफझलखानाने छत्रपती शिवाजी महाराजांना मिठी मारण्याच्या बहाण्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. असा काही हल्ला होऊ शकतो, याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांना आधीच कल्पना होती. अफझल खानाने मिठी मारण्याच्या बहाण्याने हल्ला करताच शिवाजी महाराजांनी ताबडतोब आपले खास शस्त्र वाघनखे काढून अफझलखानाला ठार केले.

वाघनखे काय आहे?

आपण ज्या वाघनखांबद्दल आतापर्यंत एकात आलो आहोत त्या वाघनखांबद्दल सांगायचे झाले तर वाघनखे हे मजबूत धातूपासून बनवलेले शस्त्र आहे, ज्यात वाघाच्या पंजाच्या नखांप्रमाणे धारदार दांडके जोडलेले असतात. ती व्यक्तीच्या हाताच्या मुठीत बसते. याच्या दोन्ही बाजूंना अंगठी असते जी हाताच्या पहिल्या आणि चौथ्या बोटात घातली जाते. यामुळे ते हातात बसते. यानंतर, हल्ला केल्यावर समोरच्या व्यक्तीला रक्तस्त्राव होतो. यातून कुणाचा खूनही होऊ शकतो. असे म्हणतात की, शिवाजी महाराज हे खास शस्त्र आपल्या सुरक्षिततेसाठी नेहमी स्वतः जवळ ठेवायचे.

शिवाजी महाराजांची वाघनखे भारतातून ब्रिटनपर्यंत कशी पोहोचली?

एका वृत्तानुसार, शिवाजी महाराजांचे हे खास शस्त्र स्वातंत्र्यापूर्वी मराठा राज्याची राजधानी असलेल्या सातारा येथे होते. इंग्रज भारतात आल्यानंतर मराठा पेशव्यांच्या पंतप्रधानांनी ते ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी जेम्स ग्रँट डुप यांना भेट म्हणून दिले. यानंतर, जेव्हा अधिकारी 1824 मध्ये ब्रिटनला पोहोचले, तेव्हा त्यांनी ते व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाला दान केले. तेव्हापासून ते तिथेच आहे.