सातारा प्रतिनिधी | कोविड घोटाळा भाजपचे सातारा येथील उमेदवार जयकुमार गोरेंच्या चांगलाच अंगलट आला आहे. या घोटाळ्याचा तपास कोणाच्याही दबावाखाली करू नका, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी सातारा पोलीस अधीक्षकांना खडसावले आहे. घोटाळ्याचा निःसंदेह तपास करून त्याचा अहवाल पुढील सुनावणीत सादर करा, असे आदेशही न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सातारा पोलिसांना दिले आहेत. 27 नोव्हेंबर 2024 रोजी यावर पुढील सुनावणी होणार आहे.
साताऱयातील मायणी येथील कोरोना उपचार केंद्रातील घोटाळ्याच्या सखोल चौकशीसाठी दीपक देशमुख यांनी अॅड. वैभव गायकवाड यांच्यामार्फत याचिका केली आहे. या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयाने या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार गोरे यांच्यासह अन्य जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास योग्य प्रकारे सुरू असल्याची माहिती सातारा पोलिसांकडून न्यायालयाला देण्यात आली.
तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का?
मंगळवारच्या सुनावणीला सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख हे व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे हजर होते. तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का, अशी विचारणा न्यायालयाने पोलीस अधीक्षक शेख यांना केली. आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. दीपक देशमुख यांनी केलेल्या आरोपांची सविस्तर चौकशी सुरू आहे, असे पोलीस अधीक्षक शेख यांनी न्यायालयात स्पष्ट केले.