दीपक देशमुख यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कोविड घोटाळ्याचा गुन्हा नोंदवण्यासाठी याचिका दाखल केल्यानेच सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटकेची कारवाई केली, असे कान उपटत उच्च न्यायालयाकडून दीपक देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे बेछूट कारवाई करणाऱ्या ईडीला चांगलीच चपराक बसली आहे.

ईडीने 2 ऑगस्ट 2024 रोजी देशमुख यांना अटक केली. ईडीच्या या कारवाईला देशमुख यांनी अ‍ॅड. वैभव गायकवाड यांच्यामार्फत याचिका दाखल करून आव्हान दिले आहे. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने ईडीवर कडक ताशेरे ओढत देशमुख यांना 50 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. देशमुख यांच्या याचिकेवर 26 नोव्हेंबर 2024 रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

ज्याचा आधार घेत देशमुख यांची कोठडी घेण्यात आली ती सर्व कागदपत्रे ईडीकडेच आहेत. या कागदपत्रांमध्ये छेडछाड होण्याची काहीच शक्यता नाही, असेही न्यायालयाने ईडीला फटकारले आहे. मूळ गुन्हा घडल्यानंतर तब्बल आठ वर्षांनी ईडीने देशमुख यांना अटक केली. ही कारवाई चांगल्या मनाने ईडीने केलेली नाही. कारण संबंधित गुह्यात देशमुख यांचे नाव नाही. ते चौकशीला हजर राहत होते. अशा परिस्थितीत देशमुख यांच्या अटकेचे कोणतेच ठोस कारण तूर्त तरी दिसत नाही, असे न्यायालयाने नमूद केले आहे.

ईडीला अटक करण्याचे अधिकार आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या अधिकारांचे निकष ठरवले आहेत. देशमुख यांना अटक करताना ईडीने या निकषांचे पालन केले नाही. अधिकाऱ्यांनी मनमानीपणे ही कारवाई केली, असे गंभीर निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.

नेमकं काय आहे प्रकरण?

कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीत गैरप्रकार झाल्याचा गुन्हा ईडीने नोंदवला आहे. देशमुख यांचे वडील अप्पासाहेब देशमुख यांना ईडीने 6 मे 2022 रोजी अटक केली. याचा मूळ गुन्हा 2016 मध्ये सातारा येथील वडूज पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. ईडीने दोनवेळा दीपक देशमुख यांना चौकशीसाठी समन्स पाठवले. नंतर मूळ गुह्याची लोक अदालतमध्ये तडजोड झाली. पोलिसांनी या तडजोडीला उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने या तडजोडीला स्थगिती दिली. 12 फेब्रुवारी 2024 रोजी ईडीने पुन्हा दीपक देशमुख यांना चौकशीसाठी समन्स धाडले. त्याचे उत्तर दीपक देशमुख यांनी दिले. देशमुख यांनी भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा कोविड घोटाळा उघडकीस आणला. उच्च न्यायालयाने सातारा पोलीस अधीक्षकांना या तपासावर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले. हा तपास सुरू असतानाच ईडीने देशमुख यांना अटक केली. ही अटक बेकायदा असल्याचा दावा करत देशमुख यांनी याचिका दाखल केली.