सातारा प्रतिनिधी | केंद्र शासनाच्या निर्देशानुसार रस्ते सुरक्षिततेबाबतच्या जनजागृतीसाठी सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस विभाग सातारा, महामार्ग पोलीस, वाहतूक शाखा सातारा व सातारा रायडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून हेल्मेट सुरक्षा रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, महामार्ग पोलीस विभागाचे कर्मचारी तसेच जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा यांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी मोटार सायकल रॅलीस हिरवा झेंडा दाखवून हेल्मेट सुरक्षा रॅलीचे उद्घाटन केले. मोटर सायकल रॅली राजवाडा-सातारा नगरपालिका-पोवईनाका- अजंठा चौक-बॉम्बे रेस्टॉरंट चौक-वाढे फाटा-प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा या मार्गावरुन काढण्यात आली.
मोटार सायकल रॅलीमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, शहर वाहतूक शाखा, सातारा, महामार्ग पोलीस विभागाचे कर्मचारी, हेम ग्रुप, सातारा या कंपनीचे कर्मचारी, नंद इंटरप्रायजेस् रॉयल इनफील्डचे कर्मचारी, सातारा व कोरेगांव रायडर ग्रुपचे सदस्य तसेच ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दुचाकी चालविताना हेल्मेट वापरासंबंधी व नो हॉर्नबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. रस्ता सुरक्षा अभियान यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करुन मोटार सायकल रॅलीची सांगता करण्यात आली.