सातारा प्रतिनिधी | देशासह राज्यभरातील प्रयत्नस्थळांतील सुधारणेकडे सध्या सरकारकडून लक्ष दिले जात आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर राज्य सरकारकडून पर्यटनस्थळ विकास अंतर्गत अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. राज्यात अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत की ती दुर्गम भागात असून त्याठिकाणी दळणवळणसह पर्यटन सुविधा नाहीत. अशा दुर्गम भाग हवाई सेवेने जोडण्यासाठी उडान ५५ पोजनेंतर्गत हेलिकॉप्टर आणि ‘सी-प्लेन’ सुविधा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील आठ ठिकाणी ‘एअरो ड्रोम’ (जलाशयातील धावपट्टी) उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात आठ ठिकाणांपैकी एक सातारा जिल्ह्यातील वाईतील धोम धरण आहे.
‘सी-प्लेन’ सुविधा उभारण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील आठ ठिकाणी ‘एअरो ड्रोम’ (जलाशयातील धावपट्टी) उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्याबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) याबाबतचा प्रस्ताव भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) आणि नागरी उड्डाण मंत्रालयाला (एमसीए) दिला आहे. महाराष्ट्रात विमान वाहतूक मंत्रालयाकडून सी-प्लेन ही सुविधा सुरू करण्यासाठी प्राथमिक टप्प्यात केरळ, आंध्र प्रदेश, अंदमान व निकोबार महाराष्ट्र आणि लक्षद्वीप या ठिकाणांची निवड करण्यात आली आहे.
या ठिकाणच्या नद्या, जलाशयातून हवाई वाहतूक केली जाणार आहे या प्रकल्पासाठी कॅनडामधील ‘डे हविलंड एअरक्राफ्ट ऑफ कॅनडा लिमिटेड’ या कंपनीची विमाने वापरण्यात येणार आहेत. इंडिगो आणि पवनहंस या कंपन्या देशात सी-प्लेन सेवा सुरू करण्यास इच्छुक आहेत, तर सरकारने कमी व्यवहार्यता अनुदान निधी (गॅप फंडिंग) देण्यास समर्थता दर्शवल्याने या जलवाहतुकीचे शुल्क साधारण दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत असल्याने सामान्य माणसांनाही परवडण्याजोगे आहे डिसेंबरअखेरपर्यंत या सेवेचा देशभरात विस्तार केला जाणार आहे.
महाराष्ट्रातील ‘हि’ आहेत 8 ठिकाणे
महाराष्ट्रातील आठ ठिकाणी सी-प्लेन सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील वाईतील धोम धरण, नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण, नागपुरातील खिंडसी धरण, बुलढाण्यातील कोराडी धरण, पुण्यातील पवना धरण, नागपुरातील पेंच धरण, रत्नागिरीतील गणपतीपुळे आणि रत्नागिरी या ठिकाणी सी प्लेन सुविधा सुरु करण्यात येणार आहे.