कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील विजयनगर येथील विमानतळाला उंच बांधकाम आणि टॉवरचा धोका निर्माण झाला होता. याबाबत योग्य कारवाई करण्याची मागणी होत होती. याची दखल घेत प्रशासनाकडून विमानतळ परिसरात उंच बांधकाम आणि उंच टॉवर उभारणीस प्रतिबंध करत उंच टॉवर आणि बांधकामे काढण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार नुकतीच विमानळ परिसरातील टॉवरची उंची कमी करण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कराड हे मध्यवर्ती ठिकाण आहे. जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना कराडला विमानतळ करण्यात आले आहे. दरम्यान, या विमानतळाच्या परिसरात उंच बांधकामे आणि टॉवर उभारण्यामुळे विमान उतरण्यास आणि उड्डाण करण्यास धोका निर्माण होत होतो. त्याचा विचार करुन जिल्हाधिकारी यांनी त्या परिसरातील उंच बांधकाम आणि उंच टॉवर उभारण्यासाठी कलर कोडींगचा नकाशा जाहीर करुन प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे त्या परिसरात असणारे उंच टॉवर व बांधकांमे काढण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही सुरु करण्यात आली होती.
त्याअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडून गटविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामे काढण्यासाठी कळवण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत संबंधित उंच टॉवरची उंची कमी करण्यासाठीची कार्यवाही करण्यात आली. त्याचबरोबर यापुढे आता उंच बांधकामाबाबतही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.