सातारा प्रतिनिधी | नांदोशी, ता. खटाव हद्दीत रहिमतपूर ते औंध या मार्गावर पवारवाडी घाटात मालट्रक व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी घडली. यामध्ये दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
ज्ञानदेव निवृत्ती घोरपडे (वय 58, रा. निसराळे ता. सातारा) असे जागीच ठार झालेल्या नाव आहे तर दत्तात्रय अंतू चव्हाण (वय 60 रा. वाठार (किरोली) ता. कोरेगांव) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. तर ट्रकचालक बाळकृष्ण वामन माने (रा. देगाव ता सातारा) याच्यावर औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शनिवार, दि. 12 रोजी दुपारच्या सुमारास औंध बाजूने साताराकडे निघालेला भरधाव मालट्रक (MH11 AL 6120) पवारवाडी घाटात एका वळणावर आला असता त्याने समोरुन येणाऱ्या टीव्हीएस लूना दुचाकीला (MH11 DJ 7828) व डिझायर कारला जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की लूना ₹वरून प्रवास करणारे दोघे जण थेट मालट्रकच्या चाकाखाली आले. त्यात ज्ञानदेव निवृत्ती घोरपडे (वय 58, रा. निसराळे ता. सातारा) हे जागीच ठार झाले. तर दत्तात्रय अंतू चव्हाण (वय 60, रा. वाठार (किरोली) ता. कोरेगांव) हे गंभीर जखमी झाले.
यातील मृत्यू झालेले ज्ञानदेव घोरपडे हे शिरसवडी, ता. खटाव येथे संत शेकोबादादा दिंड़ीचे सेवेकरी होते. ते वारकरी सांप्रदायाचे असल्याने त्यांचा निसराळे परिसरात सांप्रदायात नावलौकीक होता. प्रसिद्ध व्यासपीठ चालक, विणेकरी म्हणून त्यांची ख्याती होती. आज एकादशी असलेने ते दत्तात्रय चव्हाण यांच्यासोबत शिरसवडीला निघाले होते. त्यावेळी प्रवासातच त्यांच्यावर काळाने घाला घातला. एकादशी दिवशीच पांडुरंगाची सेवा करण्यासाठी जात असताना त्यांना मृत्यू आल्याने निसराळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.