जिल्ह्यात साताऱ्यासह कराड परिसरात वादळी वाऱ्यासह वळीवाच्या पावसाची हजेरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढला असतानाच सातारा शहरासह परिसराला सलग दुसऱ्या दिवशी वळीव पावसाने चांगलेच झोडपून काढले. दुपारच्या वेळी ढगांच्या गडगडाटात जोरदार पावसाने हजेरी लावली. यावेळी वारेही वाहत होते. दरम्यान, कराड शहरासह परिसरात वादळी वाऱ्यामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तर पावसामुळे पारा घसरला असल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

शुक्रवारी सातारा शहरासह परिसरात पाऊस झाला. तसेच पाटण तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे पाटण तालुक्यात शाळा, घरावरील पत्रे उडून गेले. लोकांचे नुकसान झाले. तर शनिवारीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. सातारा शहरातील काही भागात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हलक्या सरी पडल्या. तर पावणे चार वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात पाऊस झाला.

विशेषता शहराच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडला. यावेळी जोरदार वारे वाहत असल्याने झाडे हलकावे खात होती. त्यातच वीजपुरवठा खंडित झाला होता. शहरात अवघा दहा मिनिटे पाऊस झाला तरी वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

जिल्ह्यात मे महिना सुरू झाल्यापासून पारा वाढला होता. रखरखीत ऊन पडत होते. सातारा शहरात तर बहुतांशी वेळा तापमान हे ४० अंशावर राहिले. त्यामुळे उष्णतेची लाट आल्याचे चित्र होते. परिणामी नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला. असे असतानाच दोन दिवसापासून वातावरणात बदल झाला आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार होत असून अनेक ठिकाणी वळवाचा पाऊस हजेरी लावू लागला आहे.

पाटण तालुक्यात नुकसान

पाटण तालुक्यातील अनेक भागात शुक्रवारी दुपारच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह अवकाळीने हजेरी लावली. पण, या वादळामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. काळगाव परिसरात घरावरील छप्पर उडून गेले. यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य भिजले. तर एका ठिकाणी कारवर झाड पडले. यामुळे वाहनाचे नुकसान झाले आहे. जवळपास एक तासभर वादळी पाऊस सुरू होता. वादळामुळे तालुक्यातील मालदन, तळमावले, गलमेवाडी, मानेगाव येथे मोठे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक बंद झाली आहे. वीजवाहिन्यावरही झाडे पडली आहेत. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित झाला आहे.