कराड प्रतिनिधी । पश्चिम भागातील कोयना, नवजा, कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर भागात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला ६५, नवजा येथे ५४ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली. त्यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याचीही आवक वाढली असून पाणीसाठा २५ टीएमसी इतका झाला आहे. त्याचबरोबर नवजा, महाबळेश्वरनंतर कोयनेच्या पावसानेही आता १ हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला आहे.
रविवारी सकाळपासून कोयनानगर येथे पाऊस कोसळत असून गेल्या २४ तासांत कोयनानगरला ६५ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली. सतत पडत असलेल्या पावसामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही वाढत आहे. रविवारी सकाळच्या सुमारास ७१२९ क्युसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा २४.९६ टीएमसी झाला होता. जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस सक्रिय होऊन तीन आठवडे झाले आहेत. आतापर्यंत पश्चिम भागातच चांगला पाऊस झालेला आहे. तर पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
त्यामुळे पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र, पश्चिमेकडे जोरदार पाऊस झाल्यामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहेत तसेच धरणातील पाणीसाठाही वाढू लागला आहे. शनिवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास सुरुवात केली आहे.