कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; ठोसेघर घाटात रस्ता खचला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची अवाक वाढली आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास धरणातून साडे सात हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर वाई तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या महिलेचा शोध सुरूच होता. तर ठोसेघर घाटातही रस्ता खचल्याने एेकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास पावसाचा जोर मंदावला होता. पण, दुपारपासून पुन्हा पाऊस वाढला. त्यामुळे प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागले आहे. सातारा तालुक्यातील कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे धरणात येवा वाढला आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाणी विसर्ग वाढविण्यात येणार आहे. रात्रीच्या सुमारास सुमारे साडे सात हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार होते. त्यामुळे वेण्णा नदीच्याही पाणीपातळीतही वाढ होणार आहे. परिणामी नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तर वाई येथील शिल्पा प्रकाश धनावडे या किवरा ओढ्यातील पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही त्यांचा शोध सुरू होता. स्थानिक ट्रेकर्स, पालिका आणि पोलिसांच्यावतीने शोध मोहीम सुरू होती.

मात्र, सायंकाळपर्यंततरी त्यांचा शोध लागला नव्हता. तर संततधार पावसामुळे सातारा तालुक्यातील ठोसेघर घाटातही रस्ता खचला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून खचलेल्या रस्त्याच्या भागात एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तसेच धोक्याची जाणीव व्हावी म्हणून वाहनधारकांसाठी फलकही लावण्यात आला आहे.

अतिवृष्टीमुळे झेडपी रस्त्याची मोठ्या प्रमाणात हानी

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत रस्त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पुराच्या व पावसाच्या पाण्यामुळे रस्ते खचले असून काही ठिकाणी पुलांचेही नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी दरडी व माती रस्त्यावर येवून नुकसान झाले असून अनेक रस्त्यांची अशी अवस्था दिसत आहे.