कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात उशिरा का होईना मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे. दमदारपणे बरसलेल्या पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. काेयना धरणात पाण्याची आवक सुरू झाली असून पाणी साठ्यातही हळूहळू वाढ होऊ लागली आहे. तर महाबळेश्वरला आतापर्यंत 49.06 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान कोयना धरणात पाणी साठ्यात वाढ होऊ लागल्यामुळे धरणातून सोमवारी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
सातारा शहरासह परिसरात चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. कधी ऊन्ह तर कधी पाऊस अशीही स्थिती असते. सोमवारी पावसाची बऱ्यापैकी उघडीप होती. मात्र, मंगळवारी सकाळी 11:30 च्या सुमारास सातारा शहरात जोरदार पाऊस झाला. यामुळे रस्त्यावरुन पाण्याचे लाेट वाहिले. त्यानंतर ढगाळ वातावरण तयार झाले आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वर भागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे ओढे, नाले वाहू लागल्याने धरणांत पाण्याची आवक होऊ लागली आहे. त्यातच मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला २६ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजाला ३६ आणि महाबळेश्वरला सर्वाधिक ६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.