सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चालल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. दरम्यान, शहरासह जिल्हाभरात सोमवारी उष्णतेचा पारा ४१. १ अंश सेल्सिअसवर वाढला होता. जिल्ह्यात कमाल तापमान वाढत असून या वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे.
एप्रिल महिन्याच्या मध्यान्हानंतर सूर्याची भीषण उष्णतेने नागरिकांना हैराण केले आहे. वाढलेल्या उष्णतेत काळजी न घेतल्यास उष्माघाताचा धोका होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. जिल्ह्यातील दुपारचे तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. त्यामुळे वाढलेल्या तापमानामुळे दुपारच्या वेळेत प्रमुख शहरातील रस्ते ओस पडू लागले आहेत. वाढलेला उकाडा, त्यातून निर्माण होणारे आजारामुळे नागरिकांचे लाही लाही होत आहे. वाढलेल्या तापमानाचा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी नागरिकांना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
सातारा जिल्ह्यात मार्च महिना सुरु झाल्यापासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ३९ अंशावर पारा पोहचला होता. दरम्यान, सातारा जिल्ह्याच्या पूर्व भाग दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात पारा वाढलेला आहे. कमाल तापमान ४१ अंशापर्यंत पोहचले आहे. यामुळे नागरिकांना घरात बसण्याची वेळ आली आहार. तर शेतकरी सकाळच्या सुमारास शेतातील कामे उरकून घाईत आहेत.
उष्माघात झाल्यास काय करावे…
उष्माघात झाल्यास शरीरातील जास्त झालेली उष्णता लवकरात लवकर बाहेर काढणे व रक्ताभिसरण खेळते ठेवणे हाच प्रथमोपचार आहे. सर्वप्रथम व्यक्तीला शक्य असल्यास वातानुकूलित जागेत अन्यथा सावलीत वा थंड ठिकाणी हलवावे. शरीरावरील जास्तीचे कपडे काढून टाकावेत. त्यामुळे शरीरातील उष्ण तापमान कमी होण्यास मदत होते. त्यानंतर त्रास कमी न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.