सातारा पालिका । सातारा पालिकेच्या वतीने सातारा शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यावर हरकती देखील स्वीकारण्यात आल्या. दाखल झालेल्या सुमारे एक हजार हरकतींवर गुरुवारी अखेर सुनावणी पूर्ण करण्यात आली. ही सुनावणी मुख्याधिकारी अभिजीत बापट आणि नगर रचनाकार प्रमोद ढाणके यांच्यासह इतर सदस्यांच्या समिती समोर पालिकेत पार पडली.
सातारा पालिकेच्या वतीने आगामी वीस वर्षांसाठीचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला होता. यात सातारा शहरासह विस्तारित भागातील आरक्षण निश्चिती व इतर उपक्रमांसाठीच्या जागा ठरविण्यात आल्या होत्या. हा आराखडा तयार झाल्यानंतर त्यावर हरकती व आक्षेप नोंदवण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले होते.
यानुसार सातारा शहरासह विस्तारित भागातील नागरिकांनी जाहीर वेळापत्रकानुसार 1 हजार 85 इतक्या हरकती दाखल केल्या होत्या. या हरकतीवरील सुनावणीसाठी शासन निर्णयानुसार समिती स्थापन करत त्यासाठीचे वेळापत्रक पालिकेने जाहीर केले होते. या वेळापत्रकानुसार दाखल हरकतींची सुनावणी दोन टप्प्यात झाली.
गुरुवार हा सुनावणीचा अंतिम दिवस होता. 45 जणांनी उपस्थित राहत हरकती वरील आक्षेप नोंदवले. आज अखेर प्रारूप विकास आराखड्यावर 1 हजार जणांनी म्हणणे सादर केले आहे. या म्हणण्याचा विचार करून व आराखड्यात आवश्यक ते बदल सुचवून तो प्रारूप विकास आराखडा शासनास सादर करण्यात येणार आहे. यानंतर शासन आदेशानुसार 2044 सालापर्यंतचा विकास आराखडा सातारा शहर नगरपालिका हद्दीत लागू होणार आहे.