नवीन महाबळेश्वर प्रकल्पासंदर्भात प्रारूप विकास आराखड्यावरील सुनावणीस आजपासून सुरुवात

0
426
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शासनाच्या प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी नवीन महाबळेश्वर प्रकल्पासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्यावरील हरकती व सूचनांच्या सुनावणीसाठी कालपासून सुरुवात झाली आहे. ज्यांनी या आराखड्यावर हरकती व सूचना केल्या आहेत, त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे संचालक जितेंद्र भोपळे यांनी केले आहे. यासंदर्भात तालुकास्तरीय बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे.

नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या नियोजन विभागामार्फत महाबळेश्वर जावळी, सातारा व पाटण तालुक्यातील २३५ गावांसाठी नवीन महाबळेश्वर गिरीस्थान अधिसूचित क्षेत्राची प्रारूप विकास योजना प्रसिद्ध केली आहे. नवीन महाबळेश्वर प्रकल्पात रोप वे, मिनी रेल्वे, बाजार मंडई, विविध गावातील पर्यटन ठिकाणी रस्ते व पायाभूत सुविधा, जल पर्यटन आदी पर्यटनाच्या अनुषंगाने कामे होणार आहेत. स्थानिकांच्या गरजा व समस्या लक्षात घेऊन पुढील नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी दोन महिन्यांपूर्वी जनसनावणी झाली होती. त्यानुसार प्रारूप आराखडा जगप्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर आलेल्या हरकती व सूचनांच्या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. त्यामुळे प्रकल्प सर्वसमावेशक होण्यास मदत होणार आहे असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे संचालक जितेंद्र भोपळे यांनी सांगितले आहे.

महाबळेश्वर तालुक्याची सुनावणी आज मंगळवार, दि. ४ रोजी ग्रामपंचायत कार्यालय तापोळा, पाटण तालुक्याची सुनावणी पंचायत समिती कार्यालयात पाटण , दि. ५ रोजी होणार आहे. गुरुवार, दि. ६ रोजी जावळी पंचायत समिती कार्यालय, मेढा. सातारा तालुक्याची सुनावणी शुक्रवार, दि. ७ व शनिवारी, दि. ८ रोजी पंचायत समिती कार्यालयात होणार आहे. या सुनावणी दरम्यान ज्यांना कोणाला आपले म्हणणे मांडावयाचे आहे, त्यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.