पावसाळ्यात जिल्हा वासियांच्या सुरक्षिततेसाठी ZP ची आरोग्य यंत्रणा सज्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या शेतीच्या तसेच आरोग्याच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेचा कृषी विभाग व आरोग्य विभाग दक्ष झाला आहे. त्यासाठी नियंत्रण कक्ष देखील स्थापन करण्यात आला असून तो २४ तास कार्यरत राहणार आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून आपत्तीतील लोकांना मदत देण्यात येणार आहे. तर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सूचना करण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या तालुक्यात आरोग्य विभागाकडून पुरेसा औषध साठा ठेवण्यात आला आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्ह्याचा आढावा घेण्यात येतो.

यावर्षीही नुकतीच आरोग्य विभागाची आढावा बैठकही पार पडली. या बैठकीत आरोग्य केंद्रांना पावसाळ्याच्या काळात दक्ष राहण्याची सूचना करण्यात आल्या. सध्याच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने पूर्ण तयारी केली आहे. पावसाळ्यात जलजन्य, किटकजन्य आदी आजारांची साथ परसण्याची शक्यता असते. यामुळे आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत कार्यरत उपकेंद्राकडील आरोग्य कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेऊन योग्य ते नियोजन करण्याबाबत सूचना केली आहे.

पावसाळ्यात उध्दभवणाऱ्या डेंग्यु, चिकणगुनिया सारख्या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी अगोदरच दक्षता घेण्यात आल्या आहेत. याबाबतचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून डास उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात आलेली आहेत. एकंदरीत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळ्यात उध्दभवणाऱ्या आजारावर नियंत्रण ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.