सातारा प्रतिनिधी | सर्वसामान्य जनतेचे प्रलंबित प्रश्न तालुकास्तरावरच सुटावेत, यासाठी राज्य शासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या लोकशाही दिन उपक्रमाकडे पाठ फिरविणाऱ्या. प्रशासकीय खातेप्रमुखांवर कारवाई का करू नये, अशी नोटीस बजावण्याचा निर्णय तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांनी घेतला आहे, तसे निर्देश त्यांनी दिले आहेत.
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी कोरेगाव तहसीलदार कार्यालयात लोकशाही दिन उपक्रम राबविला जातो. त्याचप्रमाणे, सोमवारी सकाळी ११ वाजता नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील तहसीलदारांच्या दालनात या उपक्रमास सुरुवात झाली. तक्रारदारांनी रीतसर तक्रारी दाखल केल्या.
मात्र, अनेक विभागांचे अधिकारी आणि खातेप्रमुख गैरहजर असल्याचे तक्रारदारांनी निदर्शनास आणून दिले. तहसीलदार डॉ. कोडे यांनी तत्काळ प्रशासकीय खातेप्रमुखांना नोटीस काढण्याचे आदेश फौजदारी शाखेच्या महसूल सहायकांना दिले.
लोकशाही दिन उपक्रमासाठी राज्य शासनाच्या खातेप्रमुखांनी उपस्थित राहावे, असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र, अनेक अधिकारी आपले प्रतिनिधी पाठवून जबाबदारी झटकून टाकत असताना कोरेगावात दिसत आहेत. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी हे चित्र बदलण्याची नितांत गरज निर्माण झाली असल्याचे सुतार यांनी सांगितले.